आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुसद तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये दि. ७ ऑगस्टला दुपारी दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. अर्धा तास पडलेल्या पावसाने नागवाडी, पाथरवाडी, शिळोणा, चिलमवाडी भागातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पुसद तालुक्यात रविवारी पडलेल्या पावसाने कापूस, तूर, सोयाबीनला जबर फटका बसला आहे. पुसद शहराला लागून असलेल्या बोरगडी, काकडदाती, श्रीरामपूरसह शहरात देखील अर्धा तास पडलेल्या पावसाने नागरिकाची एकच तारांबळ उडाली होती. रविवारचा बाजार असल्याने खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी अचानक पडलेल्या पावसामुळे एक धावपळ सुरू केली होती. जोरदार पडलेल्या पावसाने शहरातील नाल्याला पूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.
पुसद तालुक्यातील वनवारला, जामबाजार, शेलु, पिंपळगाव, पार्डी, गाजीपुरसह आदी भागात शनिवार दि. ६ ऑगस्टला रात्री जोरदार पाऊस पडला होता.सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस पिवळे पडू लागले आहे. तालुक्यातील पुसद उमरखेड रोडवरील नागवाडी,पाथरवाडी, शिळोणा,चिलमवाडी भागात रविवार दि. ७ ऑगस्टला दुपारी दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान अर्धा तास पाऊस झाला.
ढगफुटी सारखा पाऊस पडल्याने नाले,ओढे ओसंडून वाहत होते. वरच्या माळावर पडलेला पाऊसाचे धो धो पाणी खालच्या भागातील शेतशिवारत पडल्याने किशन चव्हाण, माला शिवने, मनोहर कोल्हे, मोहन राठोड,प्रकाश चव्हाण,बाबूलाल जाधव व पौळ यांच्यासह दहा ते बारा शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. येथील शेतकऱ्यांनी कापूस, तूर, सोयाबीनचा पेरा घेतला होता. शिळोणा शेत शिवारातील स्व. सुधाकरराव नाईक विद्यालया समोरील पुसद उमरखेड रोडवरील नाल्याला पूर आल्याने अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. परिसरात प्रचंड पाऊस झाल्याने पटवाऱ्यांनी परिसरातील पिकाची पाहणी केली आहे. एकंदरीत पुसद तालुक्यात अधून मधून जोरदार पाऊस बरसत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.