आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील पांढरकवडा मार्गावरील स्मशानभुमीसमोरील जागेच्या वादातून पुतण्याने काकासह चुलत भावावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चुलत भावाचा मृत्यू झाला. तर काका गंभीर जखमी आहे. ही धक्कादायक घटना मंगळवार, दि. ३ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास घडली. राहुल पाली वय २७ वर्ष, असे मृताचे नाव असून, नरेंद्र पाली वय ५० वर्ष, असे गंभीर जखमीचे नाव आहे. तर सूरज पाली, असे संशयित मारेकऱ्याचे नाव आहे.
नविन वर्षांच्या पहिल्याच आठवड्यात तिसऱ्या खुनाच्या घटनेची नोंद झाली. या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील पांढरकवडा मार्गावर असलेल्या स्मशानभुमीसमोर पाली कुटुंबीय वास्तव्यास आहे. मंगळवार, दि. ३ जानेवारी रोजी दुपारी त्या ठिकाणी बोअरवेलचे काम सुरू होते. अश्यात संशयित सूरज पाली याचा काका नरेंद्र, चुलत भाऊ राहुल याच्यासोबत चांगलाच वाद झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात सूरज याने चक्क लोखंडी रॉडने काका नरेंद्र आणि चुलत भाऊ राहुल याच्यावर प्राणघातक हल्ला चढविल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रक्ताच्या थारोळ्यातदोघेही खाली पडले होते. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान राहुल पाली याचा मृत्यू झाल्याचे माहिती डॉक्टरांनी दिली. तर गंभीर जखमी असलेल्या नरेंद्र पाली यांच्यावर उपचार सुरू आहे. वृत्तलिहीपर्यंत या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू होती. या खून प्रकरणात संशयित सूरज पाली याच्यासह दोन ते तीन जणांचा सहभाग असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस करीत आहे. संशयित मारेकऱ्यांची नावे आली आहे. त्यावरून शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची टीम मारेकऱ्यांच्या शोधात रवाना करण्यात आली आहे.
एसपी, अॅडिशनल एसपींची घटनास्थळी भेट
शहरातील पांढरकवडा मार्गावरील स्मशानभुमीसमोर खुनाची घटना घडली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. दरम्यान, घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, शहर ठाणेदार नंदकुमार पंत, अवधुतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा उपस्थित होता.
जिल्ह्यात तीन दिवसांत तिसरी हत्या
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी यवतमाळ शहरातील वाघापूर परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केली. तर दुसऱ्या घटनेत बाभुळगाव तालुक्यातील दाभा येथे सावत्र बापाने मुलाची हत्या केली. या घटनेची शाई वाळत नाही, तर यवतमाळ शहरातील पांढरकवडा मार्गावर असलेल्या स्मशानभुमीसमोर खुनाची तिसरी घटना घडली. तीन दिवसात तीन खुनाच्या घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.