आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:कलकाम रियल इन्फ्राच्या चेअरमनसह 9 जणांवर गुन्हा ; ग्राहकाची अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जास्त व्याज दराचे आमिष दाखवून शेकडो ग्राहकांना दोन कोटीने गंडा घालणाऱ्या कलकाम रियल इन्फ्रा कंपनीच्या चेअरमनसह नऊ जणांवर शुक्रवारी रात्री अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. विष्णू दळवी, विजय सुपेकर, सुनील वांद्रे, तुषार सोनार, संतोष थोरात, देवानंद शर्मा, संदीप पडीयार, दिलीप भोसले, सुरेश चव्हाण अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी रमेश सप्रे (५५) रा. अनुश्री पार्क, पिंपळगाव, यवतमाळ यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात िदलेल्या तक्रारीनुसार, पिंपळगाव परिसरातील अनुश्री पार्क येथे रमेश सप्रे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. याच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प निरीक्षक सुरेश चव्हाण यांच्याशी सप्रे यांनी २०१५ पासून ओळख होती. सप्टेंबर २०१७ मध्ये सुरेश चव्हाण यांनी रमेश सप्रे यांना कलकाम रियल इन्फ्रा कंपनीत एजंट प्रतिनिधी म्हणून काम करीत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर कंपनीचे कार्यालय सारस्वत चौकातील लाला बिल्डींगमध्ये असल्याचे सांगितले. तसेच इतर बँकेच्या तुलनेत जास्त व्याजदर असून दर महिना दोन हजार रूपये तीन वर्षा करीता गुंतवल्यास दोन लाख परतावा मिळेल असेही सांगितले. त्यावरून रमेश सप्रे यांनी स्वत: ४० हजार तर पत्नी प्रतिभा सप्रे हिच्या नावाने ३० हजार अशी ७० हजार रुपयाची गुंतवणूक केली. काही वर्षातच या कंपनीवर रमेश सप्रे यांना संशय आल्याने त्यांनी पूर्ण तीन वर्ष पैसे भरले नाही. दरम्यान रमेश चव्हाण यांना गुंतवणूक केलेली रक्कम परत करण्याबाबत विचारपूस केली असता, दोन ते तीन महिने थांबावे लागले, असे सांगण्यात आले. दरम्यान सप्रे यांना पैश्याची नितांत गरज असल्याने त्यांनी चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे रमेश सप्रे यांनी थेट कंपनीचे कार्यालय गाठले. त्या ठिकाणीदेखील कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरेच मिळाली. दरम्यान सप्रे यांनी गुंतवणूक केलेल्या पैशांबाबत चौकशी केली असता, अनेकांची रक्कम मिळालीच नसल्याचे समोर आले. यात रामभाऊ शिरभाते, संजय बुटले, गणेशसिंग शंकर सिंग बिसेन आदी ओळखींच्या लोकांचीदेखील फसवणूक झाल्याचे समजले. कलकाम रियल इन्फ्रा कंपनीतील चेअरमनसह प्रतिनिधींनी जिल्ह्यातील २०० ते ३०० गुंतवणूकदारांची जवळपास दोन कोटीने फसवणूक केली. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.

दामदुप्पटचे आश्वासन देत काढता पाय कलकाम रियल इन्फ्रा कंपनीने तीन वर्षात दामदुप्पटचे आश्वासन ग्राहकांना देत काढता पाय घेतला आहे. अनेकांच्या कोट्यवधींच्या ठेवी कंपनीत असून आता कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे संतप्त ग्राहकांनी अवधुतवाडी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली.

घरी जावून दाखवले वेगवेगळे आमिष कलकाम रियल इन्फ्रा ही मुंबईची संस्था असून या कंपनीचे यवतमाळ येथेही कार्यालय आहे. या संस्थेमार्फत अनेक एजंट हाताशी धरून विविध प्रकारच्या योजना राबवण्यात आल्या. यात दामदुप्पट, मासिक ठेव, दैनंदिन ठेव आदी योजनांचा समावेश आहे. या संस्थेचे एजंट चक्क ग्राहकांच्या घरी जावून त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून विश्वास संपादित करीत होते. अनेक दिवसांपासून हा प्रकार शहरात सुरळीत सुरू होता. अनेकांनी तीन वर्षात दाम दुप्पट पैसे मिळावेत, या लालसेपोटी संस्थेशी वारंवार व्यवहार केले. मात्र गेल्या काही महिन्यापासून कंपनीने देवाण-घेवाणचे व्यवहारच पूर्णपणे बंद केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...