आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम गणेश मंडळाचा देशभक्तीचा जागर:दारव्हा येथे श्री गणेशाची सायकलस्वारी ; दर्शनासाठी नागरिकांची गर्दी

दारव्हा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील एका गणेश मंडळाने चक्क देशभक्तीचा जागर करीत सायकलवर विराजमान बाप्पाची मूर्ती विराजमान केली आहे. सायकलस्वार गणरायाची ही मुर्ती शहरवासीयांसाठी ती कुतूहलाचा विषय बनली आहे.गणेशोत्सव म्हटले की, अबालवृद्धांच्या आनंदाला उधाण येते. यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा होत आहे. राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळाला शासनाने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करीत सामाजिक तथा देशभक्तीचा संदेश देणारे देखावे साकारण्याचे आवाहन केले. दारव्हा येथील अंबिका नगरच्या ओम गणेश मंडळाने सायकलवर विराजमान गणेश मूर्तीची स्थापना करून आगळा वेगळा आदर्श निर्माण केला. दारव्हा येथील मूर्तीकार शशांक वानखडे यांनी सर्वांगसुंदर गणेश मूर्ती साकारली. विशेष म्हणजे ओम गणेश मंडळाने माजी सैनिक संजय गावंडे यांचे हस्ते मूर्तीची स्थापना करीत सामाजिक बांधिलकी जपली. प्रसिद्ध पेंटर खतीब यांनी देशभक्तीपर तैलचित्रे कुंचल्यातून साकारत देशभक्तीचा जागर केला. परिसरातील चिमुकल्यांनी सायकल रॅली काढून गणरायाचे स्वागत केले.

दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षी देशभक्तीचा जागर करीत “सायकल चालवा, पर्यावरण वाचवा” संदेश दिला आहे. आजवर शेतकरी आत्महत्या, आतंकवाद, बेटी बचाव बेटी पाढाव, वृद्धाश्रम, वृक्षारोपण, कोरोना जनजागृती आदी ज्वलंत विषयावर विलोभनीय दृश्य साकारत सामाजिक प्रबोधन केले. शिवाय सामान्य ज्ञान स्पर्धा, गरजूंना ब्लँकेट वाटप, अन्नदान, वृक्षारोपण, देशभक्तीपर गीत संध्या आदी उपक्रम राबवले. यावर्षी सुद्धा सामाजिक उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

ओम गणेश मंडळाचे अध्यक्ष जीवन काळे, उपाध्यक्ष संदीप शिले, सचिव स्वप्निल राठोड, कोषाध्यक्ष प्रवीण राऊत, विलास शिले, किशोर राऊत, ऋषिकेश गोटे, गौरव डोमाळे, महेश दंडे, अमोल ठोंबरे, अभिषेक गांवडे, निखील मडसे, रुपेश शिले, अमोल राठोड़, राजेश पराळे कार्तिक शिले विधी सल्लागार ॲड. नितीन जवके मार्गदर्शक सुनील आरेकर आदी कार्यकर्ते दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होतात.

बातम्या आणखी आहेत...