आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज पडल्याने मृत्यू:दिग्रसमध्ये मुलगी तर पुसदमध्ये युवतीचा मृत्यू; 2 दिवसांत 6 बळी

दिग्रस/पुसद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात अद्याप मान्सूनच्या सरी बरसलेल्या नाही. दरदिवशी आकाशात भरुन येणारे काळे ढग, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यामुळे शेतकऱ्यांना पाऊस बरसणार अशी आशा लागुन असते. प्रत्यक्षात पाऊस येतच नाही. त्याऊलट विजांचा तांडव मात्र कायम सुरू आहे. जिल्ह्यात वीज पडल्याने मृत्यु होण्याचे सत्रच सुरू झाले आहे. त्यात बुधवार दि. १५ जुन रोजी पुसद आणि दिग्रस तालुक्यात घडलेल्या दोन घटनांमध्ये दोघींचा मृत्यु झाला. मंगळवारी देखील पांढरकवडा आणि झरी तालुक्यात वीज पडुन चौघांचा मृत्यु झाला होता हे विशेष.

दिग्रस तालुक्यातील माळ हिवरा येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाच्या दरम्यान शेत शिवारात वीज पडून एका ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि. १५ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली. रोहिणी शंकर आगोसे, रा. माळहिवरा असे मृत मुलीचे नाव आहे. बुधवारी दुपारी माळ हिवरा भागातील शेत शिवारात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पाऊस पडला. यात आपल्या आईसह स्वतःच्या शेतात गेलेल्या मुलीच्या अंगावर अचानक वीज पडल्याने तिचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले.

याचप्रमाणे पुसद तालुक्यातील इनापुर शेत शिवारात बुधवार दि. १५ जून रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटात पाऊस झाला. यावेळी अचानक वीज पडल्याने परिसरातील शेत शिवारात चुलत्याच्या शेतात काम करणाऱ्या एका १५ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत इतर दोन युवती गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांकरिता दाखल केले आहे.

पल्लवी दिलीप चव्हाण वय १५ वर्षे रा. इनापुर असे मृत झालेल्या युवतीचे नाव आहे. तर रविना अनिल चव्हाण वय १६ वर्षे, आरती सुनिल चव्हाण वय १६ वर्ष रा. इनापुर यांच्यावर दवाखान्यात उपचारांकरिता दाखल केले आहे. शांताबाई धर्मा चव्हाण वय ६५ वर्षे, देवराव कनीराम चव्‍हाण वय ५८ शेतामध्ये काम करीत होते. त्यांच्यासोबत पल्लवी चव्हाण, रवीना चव्हाण, आरती चव्हाण ह्या देखील सरकी लागवडीचे काम करीत होत्या. दरम्यान दुपारच्या वेळेला अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट सुरू होवुन अचानक शेतात वीज कोसळली. ती काम करत असलेल्या पल्लवीच्या अंगावर कोसळली. वीज कोसळल्याने पल्लवीचा जागीच मृत्यू झाला तर रविना व आरती जखमी झाल्या.

बातम्या आणखी आहेत...