आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:स्वागत समारंभाला जाणाऱ्या चौघांचा मृत्यू

नेर / यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेर शहरापासून आठ किमी अंतरावर असलेल्या अमरावती - यवतमाळ राज्य महामार्गावरील वटफळी शिवारात राज्य परिवहन महामंडळाची बस व कार यांच्यात समोरासमोर धडक बसली. या धडकेत कारमधील दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर कार आणि बसमधील १८ प्रवाशी जखमी झाले. कारमधील तीन गंभीर जखमींना वर्धा येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. ही धक्कादायक घटना नेर तालुक्यातील वटफळी शिवारात रविवार, दि. ४ डिसेंबरला सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

रजनी अशोक इंगोले (४७), राधेश्याम अशोक इंगोले (२७), वैष्णवी संतोष गावंडे (२२), सारिका प्रमोद चौधरी सर्व रा. यवतमाळ व कनेरगाव जि.वाशिम असे मृतांची नावे असून साक्षी प्रमोद चौधरी (१७) रा. पिंपळगाव, पुसद, प्रमोद पांडुरंग चौधरी (४५), सविता संतोष गावंडे, सचिन नारायण शेंद्रे रा. यवतमाळ, धनंजय माधव मिटकरे असे अपघातातील जखमींची नावे आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गावंडे, चौधरी व इंगोले कुटुंबीय दि. २ डिसेंबरला एका विवाह सोहळ्यानिमित्त अमरावती गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. ३ डिसेंबरला अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे स्वागत समारंभ असल्याने या तीन कुटुंबीयांतील आठ जण टियागो कार क्रमांक एमएच-२९- बी सी ९१७३ ने गेले होते. दरम्यान कार्यक्रम आटोपल्यानंतर रविवारी सकाळी संपूर्ण कुटुंबीय अमरावती येथून देवीचे दर्शन घेऊन यवतमाळकडे परत निघाले होते. नेर तालुक्यातील वटफळी शिवारात विरुद्ध दिशेने जात असलेल्या एसटी बस क्रमांक एमएच-०६-८८२६ची कारला समोरासमोर जबर धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये वाहनातील राधेश्याम इंगोले आणि रजनी इंगोले या दोन मायलेकांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह नेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कारमधील सहा प्रवाशी गंभीर जखमी झाले होते. दरम्यान कारमधील जखमींला तातडीने यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान वैष्णवी गावंडे आणि सारिका चौधरी या दोघींचा मृत्यू झाला. तर कारमधील तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्या तिघांना तातडीने वर्धा येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. वृत्त लिहिपर्यंत नेर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्हती.

यवतमाळ - धामणगाव मार्गावर दुचाकीस्वार ठार बाभूळगाव । यवतमाळ- धामणगाव राज्य मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराची जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार, दि. ४ डिसेंबरला दुपारच्या सुमारास घडली. दुचाकीस्वार सय्यद जाफर सय्यद गफ्फार (४५) रा. इंदिरानगर, यवतमाळ असे मृताचे नाव आहे. मृत सय्यद जाफर हा दुचाकी क्रमांक एमएच-२९-एफ- ३४८१ ने यवतमाळकडे जात असतांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय बाभूळगाव येथे नेण्यात आले.

बसमधील प्रवासी किरकोळ जखमी : कृष्णा तोडसाम, रेणुका तोडसाम रा. ढोकी ता. पांढरकवडा, वनिता कढे (३८), राजेंद्र कढे (४४), जान्हवी कढे (१४) रा. मसली ता. काटोल, सचिन शेंद्रे (४०), परवेझ खलील बेग (१७) रा. यवतमाळ, धनंजय निरकटे (४३) रा. ढाणकी, शोभा काळे (६०) रा. मोझर, रोशन बोकडे (३७) रा. नेर, मंगला मोरले (४६), पायल मोरले (१७) अशी जखमींची नावे असून विजय जाधव आणि अमर जुनगर अशी बसचालक, वाहकाची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...