आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोषयुक्त मोबाइल प्रकरणी नुकसान भरपाईसाठी २९ मार्च २०२२ रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाखल प्रकरणात १३ फेब्रुवारी २०२३ रोजी निकाल दिला. मोबाईल विक्री करणारा दुकानदार, सर्व्हिस सेंटर व कंपनीवर दोषयुक्त मोबाईल विक्रीसह विक्री पश्चात सेवेत त्रुटी व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत ग्राहकाला नवीन दोषयुक्त मोबाईल किंवा मोबाइलची ९ टक्के व्याजासह रक्कम नुकसान भरपाईसह तसेच तक्रार खर्च ८ हजार रुपये ग्राहकाला देण्याचे आयोगाचे अध्यक्ष आनंद जोशी व सदस्या शिल्पा डोल्हारकर यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. या प्रकरणाची माहिती अशी की, अंधारवाडी (जि. हिंगोली) येथील रहिवासी हनुमान नारायण कोरडे हा शिक्षणासाठी रिसाेड येथील जमदाडे वसतिगृहात राहत आहे. त्याने रिसोड येथील सागर मोबाईल येथून १९ हजार रुपये किंमतीचा रेडमी नोट १० प्रो-मॅक्स हा मोबाईल खरेदी केला होता.
मात्र मोबाईल घेतल्यानंतर काही दिवसांतच हँडसेट गरम होणे, कॅमेऱ्यात बिघाड, हँग होणे आदी तक्रारी भेडसावत असल्याने हनुमानने सागर मोबाईल सेंटरमध्ये संपर्क साधला. दुकानदाराच्या सांगण्यावरुन त्याने सदर माेबाइल वाशीम येथील सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवला. मात्र सर्व्हिस सेंटरमध्ये दोन ते तीन वेळा दुरुस्ती करुनही बिघाड दूर झाला नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने मोबाईल कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवली. मात्र दुरुस्तीसाठी ठेवून घेतलेला मोबाईल सर्व्हिस सेंटरकडून परत देण्यात आला नाही. तसेच दोषयुक्त मोबाइलच्या बदल्यात गॅरंटीप्रमाणे नवीन मोबाइलही देण्यात आला नाही. त्यामुळे झालेल्या शैक्षणिक व आर्थिक नुकसान भरपाईसाठी तक्रारकर्त्याने २९ मार्च २०२२ रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात प्रकरण दाखल केले.
निकालात आयोगाने म्हटले आहे की, ग्राहकाला विक्री केलेली दोषयुक्त वस्तु बदलून देण्याची जबाबदारी संपुर्णपणे विक्रेता व उत्पादकाची आहे. ग्राहकाला बिघाडयुक्त मोबाईल देवून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत आयाेगाने तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजुर करुन मोबाइल विक्रेता, सर्व्हिस सेंटर व कंपनी या तिघांनी संयुक्तरीत्या तक्रारकर्त्याला नवीन मोबाईल द्यावा किंवा मोबाइलची किंमत ९ टक्के व्याजासह परत करावी. तसेच तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रासापोटी ५ हजार व तक्रार खर्च ३ हजार असे ८ हजार रुपये द्यावे. सदर रक्कम ४५ दिवसांत न दिल्यास वरील रकमेवर २ टक्के अतिरिक्त व्याजासह रक्कम वसुल करण्यास तक्रारकर्ता पात्र राहील, असेही निकालात नमूद आहे. या प्रकरणात अॅड. सर्वजीत गोरे यांनी तक्रारकर्त्याची बाजू मांडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.