आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण संस्था:भटके विमुक्तांसाठी वेगळी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची मागणी

मानोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विमुक्त भटके व विशेष मागास प्रवर्ग यांच्या विकासासाठी कटिबद्ध असण्याची घोषणा करणारी महात्मा फुले शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था ही मूळ भटके विमुक्तांच्या तोंडाला पाने पुसत असून केवळ ओबीसी संवर्गाच्या विकासासाठी कार्य करीत असल्याचा आरोप अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे महासचिव तथा महा ज्योती बचाव कृती समितीचे सदस्य नामा बंजारा यांनी केला आहे.

शासनाने ओबीसी व विमुक्त भटक्यांच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योती ही संस्था स्थापन केली. ओबीसी, भटके विमुक्त व विशेष मागास प्रवर्ग यांना त्यांच्या आरक्षणानुसार प्रशिक्षण व इतर संधी मिळतील अशी अपेक्षा भटके विमुक्त व विशेष मागास प्रवर्ग यांना होती. परंतु महाज्योतीचे कामकाज बघता ही संस्था केवळ ओबीसी संवर्गाच्या विकासासाठीच स्थापन करण्यात आली असून भटके विमुक्त व विशेष मागास प्रवर्ग यांना केवळ गाजर दाखवण्याचे कार्य करीत आहे. महाज्योतीकडून भटके विमुक्तांच्या वाट्याला फारसे काहीही आले नाही, त्यामुळे भटके विमुक्तांसाठी महाज्योती,सारथी, बार्टी या संस्थेसारखी वेगळी संस्था स्थापन करण्याची मागणी नामा बंजारा यांनी केली आहे. महा ज्योतीच्या वाढीसाठी आतापर्यंत सगळी आंदोलने भटके विमुक्तांनी केली, महाज्योतीचे महत्व खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य भटके विमुक्तांनी केले पण दुर्दैव असे की महाज्योतीने भटके विमुक्तांसाठी काहीही केले नाही. त्यामुळे ही संस्था आपल्यासाठी नाही अशी धारणा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची झाली आहे असून या संस्थेकडून भटक्या विमुक्तांच्या विकासाचे दिव्य स्वप्न पाहणे चुकीचे आहे असेही ते म्हणाले.

मागील वर्षी महाज्योतीला शासनाकडून चार हजार टॅब मिळाले असल्याचे कळते. त्यापैकी जवळपास पंधराशे टॅब भटके विमुक्तांच्या वाट्याला यायला हवे होते. परंतु प्रत्यक्षात केवळ तीनशे साडे तीनशे टॅब भटके विमुक्तांच्या विद्यार्थ्यांना मिळाले. भटके विमुक्तांचे उर्वरित टॅब गेले कुठे असा सवालही तांडा सुधार समितीने उपस्थित केला आहे. महा ज्योतीच्या अशासकीय संचालकपदी भटके विमुक्तांचा एकतरी प्रतिनिधी नेमावा अशी मागणी अनेक संघटनांनी वर्षभर लावून धरली. परंतु विमुक्त भटक्यांचा एकाही तज्ज्ञांची अशासकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे महा ज्योती ही संस्था भटके विमुक्तांना केवळ गाजर दाखविण्याचे कार्य करीत असल्याची बाब कार्यकर्त्यांच्या लक्षात आली असून भटके विमुक्तांच्या अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष खदखदत असल्याची भावना नामा बंजारा यांनी व्यक्त केली. त्यामुळे भटके विमुक्तांच्या विकासासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची मागणी तांडा सुधार समितीकडून करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...