आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वोच्च न्यायालयाचा सर्वेक्षण अधिकारी असल्याची बतावणी करीत एका तोतयाने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वोच्च न्यायालय समितीचा डेस्क तथा सर्वेक्षण अधिकारी कार्यालय थाटले. मात्र नागपुर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे सुमारे २ महिन्यांपासून सुरू असलेल्या या कार्यालयाचे आणि तोतया अधिकाऱ्याचे अखेर बिंग फुटले. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडूनही आता शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विजय रा. पटवर्धन या नावाने तो तोतया सर्वोच्च न्यायालय समितीचा डेस्क तथा सर्वेक्षण अधिकारी म्हणुन वावरत होता. त्याने ५ जानेवारी पासुन जिल्हाधिकारी कार्यालयात हे कार्यालय सुरू केले होते. विशेष म्हणजे त्याने कार्यालयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जागा उपलब्ध करुन देण्यासाठी अर्ज करुन जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहुन त्याने चक्क लॅन्डलाइनवर फोन करुन सर्वोच्च न्यायालयातून बोलत असल्याचे सांगत प्रशासनावर दबाव आणला होता.
८१ प्रकारचे शिक्के जप्त आरोपीने नागपुर येथे ५ मार्च रोजी आदर्श विद्यामंदिरात २० जागांसाठी परिक्षा आयोजित केली होती. यासाठी कोतवाली पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली होती. त्यासाठी त्याने दिलेल्या अर्जावरुन कोतवाली पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चौकशी सुरू केली. त्यात या तोतयाचे बिंग फुटले. त्यावरुन कोतवाली पोलिस पथकाने प्रथम माहुर गाठून आरोपी किरायाने राहत असलेल्या घराची झाडाझडती घेतली. त्यानंतर यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय गाठून प्रशासकीय इमारतीमध्ये त्या तोतयाने थाटलेल्या कार्यालयात धडक दिली. या ठिकाणावरुन पोलिसांनी तब्बल ८१ प्रकारचे शिक्के, काही लेटरपॅड आणि बरेच कागदपत्र जप्त केले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.