आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्हा बँकेतर्फे 1 लाख एटीएम कार्ड वाटप; दोन महिन्यात ग्राहकांकडून 4 कोटींचे ऑनलाइन व्यवहार

यवतमाळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व सभासद, खातेदारांना आवश्यक असलेल्या प्रत्येक ठिकाणी नगदी स्वरुपात रोख रक्कम उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने एटीएम सुविधा सुरू केली होती. त्याला मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे अल्पावधीत बँकेने तब्बल एक लाख एटीएम कार्ड वितरीत करण्याचा टप्पा गाठला आहे. इतकेच नव्हे तर या कार्डच्या माध्यमातुन हजारो खाते धारकांनी दोन महिन्यातच तब्बल ४ कोटींचे ऑनलाइन व्यवहार केले आहेत.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने इतर बँकांच्या स्पर्धेमध्ये टिकुन राहण्यासाठी विविध अद्ययावत ऑनलाइन प्रणालीचा वापर सुरू केला आहे. त्यात बँकेची विविध कामे नागरिकांना घरी बसुन ऑनलाइन पद्धतीने करता यावी यासाठी वेगवेगळे अॅप बँकेने तयार केले आहे. इतर बँकेच्या खातेदारांप्रमाणे जिल्हा बँकेच्या ग्राहकांना गरजेच्या प्रत्येक वेळी हव्या त्या ठिकाणी पैसे उपलब्ध व्हावे यासाठी बँकेने एटीएम सुविधा देण्यास सुरूवात केली. अल्पावधीत या सुविधेचा लाभ हजारो ग्राहकांनी घेतला. त्यामुळे बँकेने १ लाख खाते धारकांना १ लाख एटीएम कार्ड वितरीत करण्याचा टप्पा नुकताच पार केला आहे. या कार्डचा वापर करुन खेड्या-पाड्यातही ग्राहकांना पैसे काढता यावे यासाठी बँकेने नाबार्ड च्या मदतीने ३ एटीएम व्हॅन ग्राहकांच्या सेवेत रुजू केल्या आहेत. या व्हॅनचा वापर ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

बँकेने दिलेल्या एटीएम कार्डच्या माध्यमातुन केवळ मे आणि जुन या दोन महिन्याच्या काळात ६२ हजार ग्राहकांनी ४ कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. इ कॉमर्सच्या माध्यमातुन १० हजार ग्राहकांनी ऑनलाइन व्यवहार केला असुन ८१४३ ग्राहकांनी या कार्डच्या माध्यमातुन १४ लाख ४२ हजार रुपयांची खरेदी केली आहे. बँकेने ज्या पद्धतीने एटीएम कार्ड वितरीत केले आहे त्याच प्रमाणे कार्डच्या सुरक्षेकडे ही लक्ष ठेवले आहे. त्यात कार्ड सेफ मोबाइल अॅप ग्राहकांना देवुन त्यात कार्ड ब्लॉक करणे,, कार्डच्या माध्यमातुन होणाऱ्या व्यवहाराची मर्यादा सेट करणे अशा सुविधा देण्यात येत आहे.

एटीएम व्हॅनला उत्तम प्रतिसाद
मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आमच्या बँकेचे सभासद आणि खाते धारक आहेत. बँकेच्या या सर्व ग्राहकांना त्यांच्या गावामध्ये रोख पैसे सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने नाबार्ड च्या माध्यमातुन ३ एटीएम व्हॅन ग्राहकांच्या सेवेत सुरू करण्यात आल्या आहेत. या तीनही व्हॅनला ग्राहकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
प्रा. टीकाराम कोंगरे, अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक

बातम्या आणखी आहेत...