आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ:राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

यवतमाळ

कोविड लसीकरणात सर्व तालुक्यांनी पहिल्या व दुसऱ्या डोसमधील अंतर भरून काढत पहिल्या डोजइतकेच दुसऱ्या डोसचेही काम पुर्ण करावे. कोणत्याही परिस्थितीत कोविड लसीकरणात दुर्लक्ष न करता एप्रिल अखेर पर्यंत दुसरा डोस ८० टक्के पुर्ण करण्यात यावा तसेच १२ ते १४ व १५ ते १७ वयोगटातील पहिल्या डोसचे काम वाढवावे असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटीच्या नियामक समितीच्या सभेत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील विविध कामांचा आढावा त्यांनी घेतला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पि. एस. चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम व इतर आनुषंगिक योजनेंतर्गत गरोदर मातांची १०० टक्के नोंदणी करणे, रुग्णालयात गरोदर मातेस व एक वर्षाखालील आजारी बालकास मिळणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेत वाढ करणे व त्यांना वाहतूक सेवा उपलब्ध करुन देणे, स्थलांतरीत गर्भवतींना शासकीय योजनेचा लाभ देण्याबाबत सांगितले. हाय रिस्क प्रेग्नन्सी असणाऱ्या मातेची वेळोवेळी तपासणी करून विविध विकार असल्यास विशेष काळजी घेण्याचे आणि यादरम्यान बाळाची वाढ योग्य होत आहे का, त्याच्यात काही व्यंग तर नाहीत, यावर तपासणीकडे विशेष लक्ष देण्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी यांनी ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयामध्ये बाळंतपणाची संख्या का कमी आहे याबाबत विचारणा करून, खाजगी पेक्षा शासकीय रुग्णालयातील बाळांतपणाची संख्या वाढवण्याचे व यासाठी ग्रामीण रुग्णालयातील बाळांत कक्षाच्या अडचणी प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले. पुसद, उमरखेड आणि घाटंजी या तालुक्यात बाळांत मातांच्या मृत्यूची संख्या जास्त दिसत असून त्याबाबत तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. ग्रामीण भागात गरोदर महिलांची सोनोग्राफी नियमित केल्या जाते काय, काय अडचण आहे याबाबतही जिल्हाधिकारी यांनी माहिती घेतली. शासकीय ग्रामीण रूग्णालयाशी करार केलेल्या खाजगी सोनोग्राफी केंद्राने वेळेवर सेवा देण्यास टाळाटाळ केल्यास अशा खाजगी सोनोग्राफी सेंटरवर कारवाई करण्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यानी असंसर्गजन्य आजार, नियमित लसिकरण, मानव‍ विकास कार्यक्रम, ग्रामीण आरोग्य अभियान, निक्षय योजना, मातृवंदन योजना यासह राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील विविध बाबींचा आढावा घेतला.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गरोदर मातांची नोंदणी झाल्यापासूनच त्यांचेकडे योग्य लक्ष ठेवण्याचे, सुदृढ गर्भधारणा, सुरक्षित बाळंतपण आणि प्रसूतीनंतरच्या पुनर्प्राप्तीसाठी कोणतीही कमतरता न ठेवता योग्य औषधोपचार करण्याचे व सर्व बाबींच्या नोंदी अद्यावत ठेवण्याचे सांगितले. आढावा बैठकीला वैद्यकीय अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ, डॉ. तनवीर शेख, डॉ. निलेश लिचडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी सुभाष ढोले तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिक्षक, आरोग्य समन्वयक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...