आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्याभरात होणार कुष्ठरोग, क्षयरोगाचे सर्वेक्षण ; १३ ते ३० सप्टेंबर पर्यंत अभियान

यवतमाळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत कुष्ठरोग, क्षयरोगग्रस्तांचे सर्वेक्षण होणार आहे. त्याअनुषंगाने २ हजार ५७५ पथके गठित करण्यात आली असून, सर्वेक्षणाच्या दृष्टीने प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.जिल्हा समन्वय समितीची सभा नुकतीच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्ह्यात १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या कुष्ठरोग, क्षयरोग शोधमोहीम राबवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.

या आजाराग्रस्तांचे निदान करून त्वरीत उपचार सुरू व्हावा, हा उद्देश सर्वेक्षणाचा आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, घरोघरी भेटी देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शहरी तीन लाख ३६७ आणि ग्रामीण २३ लाख २७ हजार ३००, असे मिळून २६ लाख २७ हजार ६६७ लोकसंख्येचे सर्वेक्षण पंधरवड्यात केल्या जाणार आहे. याकरता आशा स्वयंसेविका, पुरूष स्वयंसेवक यांचे मिळून दोन हजार ५७५ पथके तयार करण्यात आली आहे. घरोघरी भेटी देवून आजाराबाबत जनजागृती आणि माहिती देवून शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. तर संशयित रुग्ण आढळून आल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात निदाणाकरीता पाठवण्यात येणार आहे.

ही आहेत लक्षणे...
अंगावर फिक्कट लालसर बधीर चट्टा येणे, मज्जातंतू जाड व दुखऱ्या होवून हातापायास बधीरता, शारीरिक विकृती येणे, चकाकणारी तेलकट व जाडसर त्वचा, कानाच्या पाळ्या जाड होणे, अंगावर गाठ येणे आदी कुष्ठरोगाची लक्षणे आहेत. तर दोन आठवड्याहून अधिकचा खोकला, ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त पडणे ही लक्षणे आहेत.

नागरिकांनी सहकार्य करावे
जिल्ह्यात घरोघरी भेट देवून कुष्ठरोग सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्ह्यात एकही कुष्ठरोग संशयित रुग्ण राहू नये यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे. घरी आलेल्या पथकाला नागरिकांनी व्यवस्थित माहिती देवून सहकार्य करावे.
डॉ. प्रशांत पवार, सहाय्यक संचालक.

बातम्या आणखी आहेत...