आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना आता घरबसल्या; पुढील आठवड्यापासून सुरु होणार लर्निंग लायसन्स सुविधा; वाहन क्रमांकही मिळणार वितरकाद्वारेच

यवतमाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सॉफ्टवेअरचे काम अंतिम टप्प्यात, 17 तारखेला होणार बैठक

वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना अर्थात लर्निंग लायसन्ससाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. फेसलेस सेवा’ याच्या माध्यमातून अर्जदारांना घरीच लर्निंग लायसन्स चाचणी देणे शक्य होणार आहे. तसेच दुचाकी व चारचाकी क्रमांक वाहन वितरकाद्वारे होणार असून यासाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. या प्रणालीमुळे अर्जदारांना एजंटगिरीतून सुटका आणि वेळही वाचणार आहे. पुढील आठवड्यापासून ही सुविधा सुरू होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वाढोकर यांनी दिली.

परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी हे पत्रक काढले आहे. आजघडीलाही अनेक जणांनी लायसन्स काढले नसताना ते वाहने चालवितात. त्यांना मात्र आता लायसन्स काढणे अगदी सोपे होणार असल्याने मोठा दिलासा मिळालेला आहे. पूर्वी लायसन्ससाठी खूप फेऱ्या माराव्या लागत होत्या. ही दमछाक आता थांबणार आहे. तसेच चाचणीसाठी कार्यालयात न येता रस्ता सुरक्षाविषयक व्हिडिओद्वारे घरबसल्या शिकाऊ परवान्याची ऑनलाइन चाचणी देता येईल. प्रश्नांची ६० टक्के अचूक उत्तरे देणाऱ्या अर्जदाराला शिकाऊ परवान्याची प्रत दिली जाईल. या निर्णयामुळे वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले .

अर्ज करण्याची प्रक्रिया अशी
शिकाऊ परवान्याकरिता अर्जदाराला विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करताना आधार क्रमांक नोंद करणे, अर्जदाराचे नाव, पत्ता, स्वाक्षरी, आधार डेटा बेसमधून परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर प्राप्त होईल. यामुळे अर्जदाराच्या ओळखीची तसेच पत्त्याची वेगळी खातरजमा करण्याची गरज भासणार नाही.

सॉफ्टवेअरचे काम अंतिम टप्प्यात, १७ तारखेला होणार बैठक
घरूनच लर्निंग लायसन्स काढण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग कामकाज पार पडणार आहे. मात्र सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. १७ तारखेला या संदर्भात ऑनलाइन बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अशा स्वरूपाच्या उपाययोजना कधीपासून होतील, याबाबतची माहिती मिळण्याची शक्यता आहे. राजेंद्र वाढोकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, यवतमाळ.

वैद्यकीय प्रमाणपत्रही मिळणार ऑनलाइन
अर्जदाराला वैद्यकीय प्रमाणपत्रदेखील डॉक्टरांमार्फत ऑनलाइन दिले जाईल. राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत ही सुविधा आहे. डॉक्टर अर्जदाराची तपासणी करून वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड करेल. आधार क्रमांक नाही अथवा ज्यांना या सुविधेचा लाभ घ्यायचा नाही, त्यांना पूर्वीप्रमाणे विभागाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज, डॉक्युमेंट अपलोड, शुल्क भरणा व स्लॉट बुकिंग करून कार्यालयात शिकाऊ परवाना चाचणीसाठी यावे.

वाहन तपासणी होणार नाही
परिवहनेतर संवर्गातील मोटारसायकल व कार या नवीन वाहनांच्या नोंदणीकरिता निरीक्षकांमार्फत वाहन तपासणी केली जाणार नाही. वाहन अधिकृत विक्रेत्याने शुल्क व कर भरल्यानंतर नोंदणी क्रमांक दिला जाईल. वाहन वितरक सर्व कागदपत्रे डिजिटल सिग्नेचरचा वापर करून ई-स्वाक्षरी करतील. नोंदणीसाठी आता वाहन किंवा कागदपत्रे परिवहन कार्यालयात सादर करण्याची आवश्यकता नाही.

बातम्या आणखी आहेत...