आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटका:दोन विभागांच्या समन्वयाअभावी कोट्यवधीचे शस्त्रक्रियागृह धूळखात

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांपैकी शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या रुग्णांवर जंतु मुक्त सर्व सुविधांनी परिपुर्ण असलेल्या शस्त्रक्रिया गृहात उपचार करता यावे या उद्देशाने जिल्हा रुग्णालयात तब्बल १५ कोटी रुपयांचा खर्च करुन ४ प्रशस्त शस्त्रक्रिया गृह तयार करण्यात आले आहेत. मात्र या शस्त्रक्रिया गृहामध्ये वातानुकुलीत यंत्रणा कार्यान्वित न झाल्याने गेल्या चार महिन्यांपासून हे शस्त्रक्रिया गृह तसेच धूळखात पडले आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागामध्ये असलेल्या असमन्वयाचा हा फटका असल्याचे दिसत आहे.

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय या ठिकाणी उपचार घेण्यासाठी दरदिवशी शेकडो रुग्ण येतात. केवळ जिल्ह्यातील नव्हे तर शेजारचे जिल्हे आणि राज्यातीलही काही रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येतात. त्या रुग्णांपैकी बऱ्याच रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असते. विविध विभागात दाखल होणाऱ्या या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात १२ शस्त्रक्रीयागृह आहेत. या बारा शस्त्रक्रिया गुहांमध्ये डोळे, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, अस्थीरोग आणि सामान्य शस्त्रक्रिया या सर्व विभागांच्या शस्त्रक्रिया पार पडतात. मात्र हे सर्व शस्त्रक्रीयागृह कालबाह्य होत आले आहेत. त्यामुळे या शस्त्रक्रिया गृहांच्या ठिकाणी सर्व अद्ययावत सोई सुविधांनी युक्त असे शस्त्रक्रिया गृह तयार करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या.

त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. त्यावरुन नागपुर येथील एका एजन्सीने तळ मजल्यावर चार अद्ययावत आणि सर्व सुविधांनी परिपुर्ण असे ४ शस्त्रक्रीयागृह तयार केले. हे काम चार महिन्यांपुर्वी पुर्ण करण्यात आले आहे. मात्र या शस्त्रक्रीयागृहासाठी आवश्यक असलेली वातानुकुलित यंत्रणा सुरू झाली नसल्याने हे शस्त्रक्रीयागृह धूळखात पडले आहे. रुग्णालयात असलेल्या १२ शस्त्रक्रिया गृहांपैकी ४ शस्त्रक्रीयागृह बंद असल्याने गेल्या कित्येक महिन्यांपासून ८ शस्त्रक्रिया गुहांमध्ये सर्व विभागातील रुग्णांच्या शस्त्रक्रिया पार पाडण्यात येत आहे.

त्याचा त्राण सर्वच विभागातील डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्ण यांना सहन करावा लागत आहे. त्याचा फटका बसुन काही रुग्णांना अत्यावश्यक नसल्याने काही दिवस शस्त्रक्रिया पुढे ढकलू असा सल्ला देण्यात येत आहे. यासंदर्भात माहिती घेतली असता जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग या दोन विभागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून असलेल्या असमन्यवयामुळे हे काम रखडुन पडले असल्याचे दिसत आहे. आता या संदर्भात जिल्हाधिकारी यांनीच आवश्यक उपाययोजना करुन नव्याने तयार केलेले शस्त्रक्रीयागृह सुरू करावे. अन्यथा त्यासाठी केलेला कोट्यवधीचा खर्च व्यर्थ होइल अशी मागणी करण्यात येत आहे.

वाढीव प्रशासकीय मान्यतेसाठी काम रखडले
नव्याने तयार करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया गृहांसाठी तब्बल ४ कोटी रुपये खर्च करुन वातानुकुलीत यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र पुर्वीच्या नकाशामध्ये बदल झाल्याने इमारतीच्या आतमध्ये ठेवण्यात येणारी यंत्रे बाहेर लावण्यात आली आहे. त्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. मात्र ती यंत्रे उघड्यावर ठेवणे शक्य नसल्याने त्याचे काम करावे लागणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यता अद्याप आली नाही. त्यामुळे ते काम रेंगाळले आहे.
निता बोकडे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग

उंदरांकडून नुकसान होण्याची शक्यता
जिल्हा रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात उंदीर आहेत. अशा स्थितीत नव्याने तयार करण्यात आलेले शस्त्रक्रीयागृह जास्त काळ बंद ठेवल्यास त्यामध्ये उंदीर शिरुन त्यांच्याकडून वासर आणि इतर साहित्य याचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत त्याच्या दुरुस्तीच्या खर्चाचा नवा मुद्दा पुन्हा उपस्थित होईल यात शंका नाही.

कलेक्टर आॅफिसकडे पाठवला प्रस्ताव
रुग्णालयात चार अद्ययावत शस्त्रक्रीयागृह तयार झाले आहे. त्यातील वातानुकुलीत यंत्रणेच्या उर्वरित कामासाठी वाढीव प्रशासकीय मान्यतेचे पत्र आम्हाला मिळाले. ते प आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवले आहे. मात्र बांधकाम विभागाने एकाच वेळी सर्व शस्त्रक्रिया गुहांमध्ये वातानुकुलीत यंत्रणेचे काम करावे लागते तरच ते काम पुर्ण होईल असे सांगितले होते. एकाचवेळी सर्व शस्त्रक्रीयागृह बंद ठेवणे किंवा ते स्थलांतरीत करणे अशक्य आहे.-डॉ. मिलिंद फुलपाटील, वैद्यकीय अधिष्ठाता, यवतमाळ

बातम्या आणखी आहेत...