आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेती घाटांचा लिलाव होऊन अधिकृतपणे रेतीघाट सुरू झाले असले तरी रेती चोरीचे प्रकार मात्र थांबले नाहीत. विविध शकली लढवून वाळू माफियांकडून रेतीची तस्करी केली जात आहे. रेतीच्या चोरट्या व्यवहारातून मोठा आर्थिक लाभ मिळत असल्याने त्यांना काळ्या पैशाची चटक लागली आहे. पैशाच्या लालसेपायी ते रेतीची तस्करी करण्याकरिता कोणतीही जोखीम पत्करायला तयार असतात. आता रेती चोरीचा त्यांनी सरळसोपा मार्ग निवडला आहे. प्रशासनाच्या अधिकृत रेती परवान्याचा ते रेती चोरी करण्याकरिता अनधिकृत वापर करू लागले आहेत. मॅजिक पेनचा वापर करून हे माफिया रेती चोरीचे जादूगार बनले आहेत. प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून एकाच रॉयल्टीवर रेतीच्या अनेक खेपा मारू लागले आहेत. प्रशासनाला मॅजिक दाखवून अधिकृत रॉयल्टीवरच रेती चोरीचे डाव साधले जात आहे.
प्रशासनाची नजरबंदी केली जात आहे की, प्रशासनालाच नजर दोष झाला आहे, हेच कळायला मार्ग नाही. मॅजिक पेनचा वापर करून सर्रास रेती चोरी सुरू असून, प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे. वाळू माफिया रेती चोरीची मॅजिक किमया साधून शासनाच्या महसुलावर डल्ला मारत आहेत. वाळू माफियांकडून सुरू असलेल्या या मॅजिक तस्करीची पोलखोल करून रेती तस्करांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. शिवसेनेचे संजय देरकर यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले असून, या रेती तस्करांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वाळू माफियांना काळ्या पैशाची चटक : रेती घाटांचा लिलाव होण्याआधी वणी उपविभागात रेती चोरीला अक्षरशः उधाण आले होते. कधी प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून तर कधी प्रशासनाशी सलगी करून रेती चोरीचे प्रकार सुरू होते. तर कुठे प्रशासनावर शिरजोर होऊन वाळू माफिया सर्रास रेतीची तस्करी करत होते. रेती तस्करीतून मोठा आर्थिक लाभ मिळत असल्याने तस्कर कोणतीही जोखीम पत्करायला तयार असायचे. रेतीचा अवैध उपसा करून रेती चोरी करणाऱ्या वाळू माफियांना चोरीच्या व्यवहारातून मिळणाऱ्या काळ्या पैशाची चटक लागली आहे. त्यामुळे त्यांनी लिलावात रेतीघाट घेऊनही रेती चोरीचे प्रकार थांबवले नाही.
एकाच रॉयल्टीवर रेतीच्या अनेक खेपा : मॅजिक पेनचा वापर करून एकाच रॉयल्टीवर अनेकदा रेतीची खेप आणली जात आहे. मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे. मॅजिक पेन वाळू माफियांकरिता रेती चोरीचा सोपा पर्याय बनली आहे. मॅजिक पेनने लिहिलेल्या अक्षरांजवळ आगपेटीची जळती काडी नेल्यास लिहिलेली अक्षरं पूर्णतः नाहीशी होतात. दुचाकीच्या गरम सायलेन्सरवरही काही वेळ मॅजिक पेनने लिहिलेला कागद ठेवल्यास कागदावरील अक्षरे मिटली जातात. याच मॅजिक पेनचा वापर करून वाळू माफिया रॉयल्टीवरील तारिख, वेळ बदलवून एकाच रॉयल्टीवर रेतीच्या अनेक खेपा आणत आहेत.
तस्करांकडून सर्रास रेतीची ओव्हरलोड वाहतूक
आजही रेती घाटांवर गैर प्रकार सुरू असून, वाळू माफियांकडून विविध फंडे लढवून रेती चोरी केली जात आहे. शासनाच्या महसुलावर डल्ला मारून वाळू माफिया मालामाल होत आहेत. दोन ब्रास रेतीच्या रॉयल्टीवर पाच ते सहा ब्रास रेती ट्रकमध्ये भरून आणली जात आहे. ६ चाकी, १० चाकी व १२ चाकी टिप्पर व हायवांच्या माध्यमातून तालुक्यात व तालुक्याबाहेर रेतीची वाहतूक केली जात आहे. रेतीचे परवानेही तालुक्याबाहेरचे आहेत. दोन ब्रास रेतीचा परवाना असताना ८ ब्रासपर्यंत रेती ट्रकमध्ये भरून आणली जात असून, हा ओव्हरलोड ट्रक पकडल्यानंतरही या ट्रकवर अल्पशा दंडाची कारवाई केली जाते. त्यामुळे या निर्ढावलेल्या तस्करांकडून सर्रास रेतीची ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.