आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात एक लाख ५२ हजार २६३ हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. परंतु, मागील दहा दिवसांपासून वातावरण बदलामुळे पहाटे धुके पडत असल्याने तूर व हरभऱ्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तूर, हरभरा पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक काळे व पिवळे पडले आहे. हरभऱ्यावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी फवारणी करत आहेत. शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ एक संकट कोसळत असून आधी अतिवृष्टी व नापिकीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता वातावरणातील बदलाने रब्बीचे पिक हातातून जाते की काय अशी भिती शेतकरी व्यक्त करत आहेत.
यंदा जिल्ह्यात खरिपाच्या हंगामात निसर्गाने दाखवलेल्या अवकृपेमुळे पिकांची माती झाली. सुमारे ९.५० लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाल्यानंतरही सुमारे ६० टक्के पीक मध्यंतरीच्या अतिवृष्टीत जमीनदोस्त झाले. हाती उरलेले पीक कसेबसे वाचवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र पावसामुळे सोयाबीन काळवंडले असून कपाशीचा पहिल्याच वेच्यात पराट्या झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या डोक्यावर केवळ कर्जाचा डोंगर चढला. अशा स्थितीत काहीशा सारवलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पुन्हा एकदा नशीब आजमावण्यासाठी तयारी सुरू केली.
जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५२ हजार २६३ हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. परंतु, मागील दहा दिवसांपासून वातावरण बदलामुळे पहाटे धुके पडत असल्याने तूर व हरभऱ्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पडत आहे. तूर व हरभराच्या पिकावर बुरशी, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. फुल गळत असून पाने कुरतडणारे कीटक वाढले आहेत. यामुळे तुरीचे पीक काळवंडले आहे. हरभऱ्यावर बुरशीसह हिरव्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. हे वातावरण असेच राहिल्यास पीक पिवळे पडून नुकसानीची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. अनेक ठिकाणी हरभऱ्याचे पीक पिवळे पडले असून काही भागात फुलांची गळती होत आहे. फुलांची अधिक गळती झाल्यास फळ धारणेवर परिणाम होऊन उत्पादनात घट येणार आहे. हरभऱ्यावर पाने गुंडाळणाऱ्या अळ्यांनी हल्ला चढवला आहे. या हिरव्या अळ्यांवर नियंत्रण न आल्यास उत्पन्न घटू शकते.
कार्बेनडॅझिम फवारणी करा
तूर फुल व कळी येण्याच्या अवस्थेत आहे. धुक्यामुळे फुल व कळी गळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी प्रति १० लिटर पाण्यात कार्बेनडॅझिम २० ग्रॅम मिसळून फवारणी करावी. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास क्लोरिपायरिफॉस १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ५० टक्के फुले व शेंगा असताना क्विनॉलफॉस २० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. दाणे भरताना शेंगा पोखरणाऱ्या अळ्या व शेंगमाशीचा प्रादुर्भाव वाढल्यास इमामेक्टिन बेंझायेट ४ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. हरभऱ्यावर बुरशी रोग प्राथमिक अवस्थेत असल्यास कॉपर ऑक्सिक्लोराइड ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पिकांच्या बुडाशी फवारणी करावी. असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
तूर काळवंडली, हरभऱ्यावर हिरवी अळी
तूर व हरभरा पिकावर बुरशी व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे पीक काळवंडले आहे. कृषी व महसूल विभागाने पंचनामे करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. हरभऱ्यावर बुरशी व हिरव्या अळीने हल्ला केल्याने आर्थिक भुर्दंड सोसून फवारणी करावी लागत आहे. गजानन शेंडे, शेतकरी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.