आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टुडंट पोलिस कॅडेट:16 शाळांमधील आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांना मिळणार पोलिस प्रशिक्षण

मयूर वानखडे | यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र स्तरावरून विद्यार्थ्यांसाठी ‘स्टुडंट पोलिस कॅडेट’ हा उपक्रम राबवण्यात येत असून, यवतमाळ जिल्ह्यातील सोळा शाळांमधील आठवी आणि नववी मधील विद्यार्थ्यांना पोलिस प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सोळा शाळांची निवड स्टुडंट पोलिस कॅडरसाठी केली आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्ये रूजावीत तसेच त्यांच्या मनात पोलिसांविषयी असणारी भीती दूर व्हावी, यासाठी राज्य सरकारकडून स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम आता राज्यातील शाळांमध्ये राबवण्यात येत आहे. या प्रोग्रामसाठी यवतमाळ जिल्ह्यातील १६ शाळांची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून गुन्ह्यास प्रतिबंध करणे, रस्ते सुरक्षा आणि वाहतूक जागरूकता, भ्रष्टाचार निर्मूलन संवेदनशीलता आणि सहानुभूती, महिला आणि बालकांची सुरक्षितता, समाजाचा विकास, दृष्ट सामाजिक प्रवृत्तीस आळा घालणे, नीतिमूल्य, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन आणि स्वच्छता या विषयांवर मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रोग्रामसाठी जिल्ह्यातील प्रत्येकी शाळांना आहार आणि क्रीडा साहित्यांसाठी ५० हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम हा केंद्र सरकार पुरस्कृत उपक्रम असून, तो राज्यात गृह विभागामार्फत शालेय शिक्षण विभागाच्या समन्वयाने राबवण्यात येत आहे, सध्या हा उपक्रम प्रथम टप्प्यात इयत्ता आठवी आणि नववीचे वर्ग असलेल्या सरकारी शाळांमध्ये राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी १६ शाळांना सन २०२२ मध्ये ८ लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या शाळांमध्ये पुसद येथील विश्वनाथ सिंह बयास नगरपालिका हिंदी विद्यालय, अकोला बाजार येथील जिल्हा परिषद विद्यालय, पुसद येथील हाजी अख्तर खान नगरपालिका उर्दू विद्यालय, पांढरकवडा येथील जिल्हा परिषद हायस्कुल, हिवरी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, महागाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, मानिकवाडा येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, नेर येथील शासकीय अ.जा. मुलांची निवासी शाळा, पुसद येथील जिल्हा परिषद माजी शासकीय मुलींची शाळा, नगर पालिका मराठी उच्च माध्यमिक विद्यालय, कुरई येथील जिल्हा परिषद हायस्कुल, सावर जिल्हा परिषद हायस्कुल, यवतमाळ येथील केंद्रिय विद्यालय, लोही येथील जिल्हा परिषद विद्यालय, उमरखेड येथील जिल्हा परिषद विद्यालय आणि बेलोरा येथील नवोदय विद्यालय आदींचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी देणार भेट
स्टुडंट पोलिस कॅडेट या उपक्रमात निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील १६ शाळांमध्ये शासनाच्या निर्देशांनूसार काम करावे लागणार आहे. या उपक्रम योग्य पध्दतीने राबवण्यात येत आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, शिक्षणाधिकारी हे अधिकारी शाळांना वेळोवेळी भेटी देणार आहे. या दरम्यान ते विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवादही साधणार आहे.

आठवड्यातून दोन दिवस विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
प्रत्येक शाळेत आठवड्यातून दोन दिवस दोन तास विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात भारतीय संविधान बाबत विद्यार्थ्यांना मराठीत माहिती देणे, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेणे, पोलिस मुख्यालय, पोलिस ठाण्यांत भेटी देणे, पोलिस शस्त्रांची माहिती देणे, जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक विभाग, आर्मी कार्यालय, एनसीसी कार्यालय आदींसह शासकीय महत्वाच्या कार्यालयात भेटी देणे, आणि याबाबत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...