आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणीबाणी:सोयाबीन बियाण्यांची आणीबाणी, महाबीजकडून मिळणार यंदा फक्त 3500 क्विंटल बियाणे

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात कापसानंतर खरिपात सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची जिल्ह्यात अक्षरश: आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली असून, जिल्ह्यातील पेऱ्याचा विचार करता तब्बल दोन लाख १२ हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. मात्र, महाबीजकडून केवळ ३५०० क्विंटलच बियाणे उपलब्ध होणार आहे. कधीकाळी महाबीजचे ३५ हजार क्विंटल बियाणे जिल्ह्याला मिळाले होते. अशात गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांकडेही ठेवणीतील बियाणे उपलब्ध नाही. परिणामी दुकानदारांकडून निकृष्ठ बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होणार आहे. जिल्ह्यात ९ लाख दोन हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी होत असते. यापैकी तब्बल २ लाख ८३ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा केला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षात सोयाबीनचा पेरा ३ लाख १० हजाराच्या घरात जात आहे. अन्य नगदी पिकांचा पर्याय असला तरी मुग, उडिदावर पडणाऱ्या किडीमुळे तसेच पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी शक्यतो सोयाबीनला प्राधान्य देत असतात. शक्यता एका हेक्टरवर शेतकरी सरासरी ७५ किलो सोयाबीन पेरतात. एकूण हेक्टरचा विचार केला असता जिल्ह्याला २ लाख १२ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज असते. चांगले उत्पादन निघावे म्हणून शेतकरी शक्यतो महाबीजच्या बियाण्यांची आग्रह धरतात. परंतु, यावर्षी महाबीजच हतबल झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाबीज यावर्षी केवळ तीन हजार पाचशे क्विंटल सोयाबीन पुरवू शकणार आहे. यामुळे प्रशासन व महाबीजकडून ही घरगुती ठेवणीतील बियाणे वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु, सर्वच भागातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन नष्ट झाले किंवा डागाळले. यामुळे शेतकऱ्यांकडे ठेवणीतील बियाण्यांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण होणार आहे. यामुळे प्रशासनाने अन्य जिल्ह्यातील किंवा दुसऱ्या राज्यातील सोयाबीन बियाणे उपलब्ध करुन शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्याची गरज आहे.

शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार बियाण्यांचा तुटवडा पाहून काही दुकानदार ऐन पेरणीच्या तोंडावर हतबल झालेल्या शेतकऱ्यांना कधीही नाव न ऐकलेल्या कंपनीचे बियाणे विकतात. अन्य कोणता पर्याय नसल्यामुळे शेतकरीही ते खरेदी करतील. तेव्हा बियाणे उगवणार ही नाही व पैसाही वाया जाण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने यावर बारिक नजर ठेवण्याची गरज आहे. केवळ कृषीच नव्हे तर अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवरही किमान पेरणी काळात देखरेखीसाठी जबाबदारी देण्याची गरज आहे. विविध चाचण्यांमुळे महाबीजचे उत्पादन घटले महाबीज शेतकऱ्यांना बियाण्यांचे प्लॉट पुरवून त्यांच्याकडूनच बियाण्यांसाठी सोयाबीन खरेदी करते. त्यानुसार अनेक निकष व पाच चाचण्यांच्या दिव्यातून पार पडल्यावर बियाणे बाजारात उपलब्ध करते. गतवर्षी केवळ ३०० हेक्टरवर प्लॉट उपलब्ध करण्यात आले. मात्र, अतिवृष्टीत अनेक प्लॉट नष्ट झाले. तसेच बीजोत्पादनासाठी अनेक शेतकरी तत्पर आहे. परंतु ठराविक शेतकऱ्यांनाच हे बियाणे उपलब्ध आहेत. नियमित कार्यक्रम राबवत असल्याने या शेतकऱ्यांना ही बियाणे मिळाली आहे. मग नविन शेतकऱ्यांनी हा प्रयोग करू नये का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बातम्या आणखी आहेत...