आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गा विसर्जन:निर्बंधमुक्त नवरात्रोत्सवाची सांगता, पाच दिवस चालणार दुर्गा विसर्जन

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षांत कोरोना संसर्गामुळे नवरात्री उत्सव साध्या पद्धतीने आणि सर्व निर्बंध पाळुन साजरा करण्यात आला. मात्र यंदा कोरोना संसर्ग ओसरल्याने निर्बंध मुक्त वातावरणात भव्य-दिव्य नवरात्रोत्सव संपुर्ण जिल्ह्यात साजरा करण्यात आला. त्यात गेल्या ९ दिवसांपासून जिल्हाभरात ठिकठिकाणी विराजमान करण्यात आलेल्या आई जगदंबेला निरोप देण्यास मंगळवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सुरूवात झाली. जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात असलेल्या सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांची संख्या पाहता पाच दिवसात टप्प्या-टप्प्याने विसर्जनास परवानगी देण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर पार पडलेल्या निर्बंध मुक्त नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात २ हजार ८५२ सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांनी माँ दुर्गेच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली होती. त्यात जिल्ह्यात यवतमाळ शहरासह इतर काही शहरातही भव्य-दिव्य देखावे साकारण्यात आले होते. हे देखावे पाहण्यासाठी शहरातील नागरिकांसोबत संपुर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी गर्दी केली. नवरात्री उत्सवाची भव्यता पाहण्यासाठी शेजारी जिल्ह्यासह शेजारी राज्यातील नागरिकही यवतमाळ येथे मोठ्या संख्येने दाखल झाले होते. त्यामुळे दरदिवशी लाखो भाविक शहरातील रस्त्यावर दिसत होते.

संपुर्ण जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त
जिल्ह्यातील दुर्गा विसर्जन प्रक्रियेसाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यामध्ये जिल्हा पोलीस दलातील सुमारे ३ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ९०० पुरूष होमगार्ड तर १०० महिला होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या २ प्लाटुन, जलद कृती दल, कमांडो पथक आदि तैनात केले आहे. याशिवाय वरिष्ठ पोलिस अधिकारी या लक्ष ठेवुन राहणार आहे

संवेदनशील तालुक्यात विशेष लक्ष
जिल्ह्यातील काही तालुके संवेदनशील आहेत. या तालुक्यात बऱ्याच अनुचित घटना घडल्या आहेत. दुर्गा विसर्जनाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांकडून वारंवार आढावा घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील संवेदनशील तालुक्यात विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्यात शांतता कमिटीची सभा घेऊन सदस्यांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.

५०४ मूर्तींचीही स्थापना
जिल्ह्यात नवरात्री उत्सवादरम्यान दुर्गा मातेच्या मुर्ती प्रमाणेच शारदा देवीची स्थापनाही मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यंदा जिल्ह्यात ५०४ सार्वजनिक शारदोत्सव मंडळांनी शारदा मातेच्या मूर्तीची स्थापना केली होती. या सार्वजनिक मंडळांना ही पाच दिवसात टप्प्या-टप्प्याने विसर्जनाची परवानगी देण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक विसर्जन ६ ते ८ ऑक्टोबर या तीन दिवसात होणार आहे.

निर्बंधमुक्त वातावरणात भव्य मिरवणुका
निर्बंधमुक्त वातावरणात यंदा नवरात्री उत्सव पार पडला. आता माता जगदंबेला निरोप देतेवेळी देखील भव्य मिरवणुका काढुन ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात मोठ्या दुर्गोत्सव मंडळांकडून विविध पथकांना पाचारण करण्यात आले आहे. ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढण्यात येत अाहेत.

बातम्या आणखी आहेत...