आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवाळीपूर्वी शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करावे, असे आदेश शासनाने दिले होते. मात्र, वंटन मंजूर न झाल्यामुळे नोव्हेंबर उजाडला तरीसुद्धा शिक्षकांचे वेतन होवू शकले नाही. परिणामी, शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बँका, पतसंस्था, तसेच इतरही उधारी परतफेड करण्यासाठी शिक्षकांना प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
अनियमित वेतनामुळे शिक्षक, कर्मचारी त्रस्त आहेत. नियमित वेतन मिळावे, ह्याबाबत शिक्षकांकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येते. मात्र, शिक्षकांचे नियमित वेतन होण्याची प्रत्येकवेळी वांदेवाडीच निर्माण होते. शालार्थ प्रणाली नुसार वेतन करावे, ह्याबाबत शासनादेश निर्गमित झाले होते. त्याकरीता बरेच महिने प्रशासनाला कसरत करावी लागली. तद्नंतर नियमित वेतन होईल, अशी आस शिक्षकांना लागली होती. मात्र, प्रत्येकवेळी शिक्षकांच्या पदरी निराशाच पडली आहे.
अशात यंदा दिवाळी २४ ऑक्टोबर रोजी आली होती. त्यामुळे शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी काढावे, असे आदेश शासन निर्णयाद्वारे देण्यात आले होते. या निर्णयामुळे शिक्षकांसह कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. मात्र, वंटन मंजूर होवू न शकल्यामुळे दिवाळीपूर्वी शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या खात्यात केवळ अग्रिम जमा करण्यात आला.
दिवाळीनंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या दृष्टीने वंटन मंजूर झाले. आणि दिवाळी नंतर लगेच दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांचे वेतन खात्यात जमा झाले. मात्र, शिक्षकांच्या वेतनाचे वंटनच मंजूर झाले नव्हते. परिणामी, शिक्षकांना मिळालेल्या अग्रीमवरच दिवाळी सारखा सण साजरा करावा लागला. आता नोव्हेंबर महिना उजाडला. तरीसुद्धा शिक्षकांच्या वेतन अदा करण्याच्या दृष्टीने आणखी काहीच पावले उचलल्या गेले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. या प्रकारामुळे शिक्षकांना बँका, पतसंस्थेचे कर्ज परतफेड करण्यासाठी प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कर्जाची परतफेड नियमित होत नसल्यामुळे व्याजाचा आकडा दिवसागणिक वाढला आहे.
व्याजाच्या रूपात पतसंस्थांच्या तिजोरीत वाढ
जिल्हा परिषद पतसंस्थेचे सभासद असलेल्या हजारो शिक्षकांनी विविध कामाकरता लाखो रूपयांच्या कर्जाची उचल केली आहे. पतसंस्थेचे व्याजदर अव्वाच्या सव्वा आहे. नियमित परतफेड केल्यास विहित मुदतीत कर्जमुक्त होते. मात्र, वेतन दिरंगाईमुळे कर्जाचा भरणा नियमित होत नाही. परिणामी, व्याजाच्या माध्यमातून पतसंस्थांच्या तिजोरीत चांगलीच वाढ होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.