आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:धान्याचे चुकारे मिळवण्यासाठी शेतकरी धडकले बाजार समितीवर; व्यापारी फसवणूक करून पसार

वणी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वणी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत व्यापाऱ्याने कास्तकारांकडून खरेदी केलेल्या धान्याचे जवळपास तीन महिने होऊनही चुकारे न मिळाल्याने कास्तकारांचा बुधवारी संयम सुटला. कास्तकार थेट बाजार समितीच्या कार्यालयावर धडकले. त्यांनी बाजार समितीच्या सभापतीसह सचिवांना धारेवर धरत चुकाऱ्याची रक्कम तत्काळ अदा करण्याची आक्रमक मागणी केली. ५ जानेवारी २०२२ ते ११ जानेवारी २०२२ या कालावधीत बाजार समितीचा परवानाधारक व्यापारी धीरज अमरचंद सुराणा (रा. बन्सल ले-आऊट, दत्त मंदिरमागे) याने १४७ कास्तकारांकडून १९३५.०२ क्विंटल धान्य (सोयाबीन, चणा, तूर) खरेदी केले.

ज्याची किंमत १ कोटी १३ लाख रुपये एवढी आहे. या व्यापाऱ्याचा जमानत दार रूपेश नवरतनमल कोचर (रा. पद्मावतीनगर) हा होता. धान्याचे चुकारे न देताच व्यापाऱ्यासह जमानतदारही फरार झाला. हे दोघेही जवळपास तिने महिने होऊनही पोलिसांच्या हाती लागले नाही. दोघेही पोलिसांना गुंगारा देत आहे व अटकपूर्व जमिनीसाठी प्रयत्न करत आहे. या व्यापाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभापती म्हणतात की, जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांची संपत्ती विकून चुकारे देवू, ही भाषा आता कास्तकारांसमोर वापरली जात आहे. व्यापाऱ्याने नाममात्र सालवंशी, शेतीचा सातबारा व कोरे चेक बाजार समितीला देऊन धान्य खरेदीचा परवाना मिळवला.

या व्यापाऱ्याच्या शेतीवर व घरावरही बँकेचे कर्ज असल्याची बाजार समितीतीलच काही कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरु होती. शेतकरी तत्काळ चुकारे देण्याची मागणी करत होते. पण शेवटी एका आठवड्यात चुकारे देण्यावर तोडगा झाल्याचे समजते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांची आक्रमकता पाहून मोठा पोलिस बंदोबस्त त्याठिकाणी ठेवण्यात आला होता. तहसीलदार व पोलिस निरीक्षकांनीही बाजार समितीमध्ये येऊन कास्तकारांच्या व्यथा समजून घेतल्या. सपोनि शिवाजी टिपूर्णे व प्रविण हिरे यांनी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेत कास्तकारांची समजूत काढली. पण शेवटी या महिन्यात धान्याच्या चुकाऱ्याची रक्कम न मिळाल्यास कर्ज काढलेल्या कास्तकारांना व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागेल, ही व्यथा मात्र कास्तकारांमधून व्यक्त होत होती.

१४७ कास्तकारांचे १ कोटी १३ लाख रुपयांचे चुकारे थकीत होते. त्यापकी बाजार समितीने ५६ लाख रुपयांचे चुकारे काही कास्तकारांना काही दिवसांपूर्वी अदा केले. उर्वरित चुकाऱ्याची रक्कम २५ फेब्रुवारीला कास्तकारांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले होते. पण एक महिना होत आला तरी कास्तकऱ्यांच्या खात्यात चुकाऱ्याची रक्कम जमा न झाल्याने कास्तकारांचा संयम सुटला. कास्तकारांनी एकजूट होऊन बाजार समितीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. धान्याची रक्कम तत्काळ अदा करा, नाही तर धान्य परत द्या, अशी आक्रमक भूमिका सभापतींच्या दालनात जमलेल्या शेतकऱ्यांनी घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...