आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरात तेजीचा अंदाज:सोयाबीनच्या विक्रीबाबत शेतकऱ्यांचे वेट अँड वॉच; आठवडाभरात प्रतिक्विंटल हजाराने वाढ

यवतमाळ5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनला मागणी असल्याने आठवड्याभरात सोयाबीनच्या दरात ८०० ते १००० रुपयांनी वाढ झाली. आठवड्यात २० टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. व्यापारी सोयाबीनचा साठा करण्यात अधिक रस दाखवत आहे. यंदा गेल्या दीड महिन्यात सोयाबीनची २० हजार क्विंटल आवक झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना सात हजारापर्यंत भाव वाढण्याची आहे ते शेतकरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहेत.

हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनच्या दरात घट झाली होती. खरीप हंगामात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत अतिवृष्टीने फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेतील हे पीक उद्ध्वस्त झालं आहे. शेतात राहिलेल्या सोयाबीनच्या पीक काढणीला प्रारंभ झाला आहे. गतवर्षी सोयाबीनला विक्रमी दर प्राप्त झाला होता. त्यामुळे यंदाही चांगले भाव मिळतील, या आशेपोटी शेतकर्‍यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. सध्याचे भाव पाहता शेतकर्‍यांच्या स्वप्नांवर पाणीच फिरल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या शेतमाल घरात असताना सोयाबीन पाच हजारांच्या खाली पोहोचल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. सोयाबीनला ४६०० ते ५००० रुपये असा दर मिळत होता. या दरामुळे सोयाबीन लागवडीचा खर्चही वसूल होतो की नाही, या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत.

आता त्यात थोडी सुधारणा झाली आहे. यंदा सोयाबीनला अधिक मागणी असून आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनची मोठया प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात ५ हजार रूपये क्विंटल दर असलेल्या सोयाबीनचे भाव ८०० ते १००० रुपयांनी वाढले आहेत. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात २० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. अजून पुढील दीड महिनाच सोयाबीनचा हंगाम असणार आहे. त्या काळात सोयाबीनची अधिकाधिक आवक होईल, अशी शक्यता नसल्याने व्यापारी सोयाबीनचा साठा करत आहेत.

मागणीच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन कमी
देशामध्ये महाराष्ट्रात शेंग तेलाचा वापर होतो तर अन्य राज्यांत मात्र खोबरेल, पाम, सोयाबीन तेलाचा वापर केला जातो. देशभरात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. सोयाबीनचा वापर विविध वस्तू, पदार्थ बनवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने यंदा जगभरात मागणी वाढली आहे. तर तुलनेने उत्पादन कमी आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात भविष्यात तेजी येणार असल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे ते सध्या चढ्या भावाने सोयाबीनची खरेदी करून साठा करत असल्याचे जाणकारांचा अंदाज आहे.

व्यापाऱ्यांकडून खरेदीला प्राधान्य
सोयाबीनचा हंगाम दीड महिन्यापूर्वी सुरू झाला. अजून दीड महिना हंगाम असेल. मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात २० टक्क्यांनी दर वाढले. व्यापारी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन खरेदी करीत आहेत.-अजय येंडे, सचिव, बाजार समिती

दहा हजार रूपये हमीभाव दिला पाहिजे
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून त्यात पुन्हा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याने शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात पिचून जात आहे. सोयाबीनला दहा हजार रूपये हमीभाव मिळाला पाहिजे.-पांडूरंग शेंडे, शेतकरी

बातम्या आणखी आहेत...