आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रयोग, सुगी पश्चात तंत्रज्ञान इत्यादीची माहिती होण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील ६० शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत अभ्यास दौऱ्यावर पाठविण्यात आले. सोमवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी हिरवा झेंडा दाखवून शेतकऱ्यांच्या वाहनांना मार्गस्थ केले.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२२-२३ मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय यवतमाळ येथून शेतकरी मार्गस्थ झाले. २ जानेवारी ते ६ जानेवारी २०२३ पर्यंत प्र क्षेत्र प्रशिक्षण व अभ्यास दौरा आहे. यवतमाळ, राळेगाव, कळंब, घाटंजी येथील महिला व पुरूष असे एकूण ६० शेतकरी व कर्मचारी पाठविण्यात आले.
यामध्ये शेतकऱ्यांना सिल्लोड येथील कृषी प्रदर्शनी, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर अहमदनगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर, कांदा लसून संचालनालय राजगुरूनगर, पुणे, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, पुणे व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान, तळेगाव दाभाडे इत्यादी संस्था व प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देण्याचा यामध्ये समावेश केला आहे. त्याकरिता जिल्हाधिकारी अमोल येडगे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कोळपकर,उपविभागीय कृषी अधिकारी अमोल जोशी तालुका कृषी अधिकारी यवतमाळ, कळंब,राळेगाव व घाटंजी तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना दौऱ्या करिता रवाना करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व आवश्यक त्या सुचना करून अभ्यास दौरा झाल्यानंतर आपले अनुभव इतर शेतकऱ्यांना सांगावे व त्यानुसार आपल्या शेतात त्याचा अवलंब करावा. अश्या सुचना देवून शेतकऱ्यांना रवाना केले, असे उपविभागीय कृषी अधिकारी अमोल जोशी यांनी कळवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.