आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेताजवळुन वाहणाऱ्या नदीपात्रात अचानक आलेले पाणी थेट शेतात शीरले. शेतीसाठी आणलेले खतांचे १२० पोते, शेतीचे साहित्य अन् कुकुटपानलातील ५०० कोंबड्या या पाण्यात वाहुन गेले. अवघ्या काही वेळात होत्याचे नव्हते झाले मात्र प्रशासनाने अद्याप कुठलीही मदत केली नाही अशी आपबीती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यापुढे सांगताना शेतकऱ्यांना अश्रु अनावर झाले.
जिल्ह्यात गेल्या महिनाभरात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने अनेक तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार शुक्रवार दि. २९ जुलै रोजी दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी शुक्रवारी राळेगाव आणि मारेगाव तालुक्यातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या काही गावांमध्ये भेट देवुन पूरग्रस्त भागातील शेतांची पाहणी केली.
यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले शेतकरी आणि गावकरी यांच्याकडून आपबीती जाणुन घेतली. उपस्थित अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीची आणि त्यासंदर्भात करण्यात आलेल्या मदतीची माहिती विचारली. प्रशासनाकडुन पंचनामे करण्यास विलंब होत असल्याचे कळताच तातडीने पंचनामे पुर्ण करा आणि त्याचा अहवाल शासनाकडे मदतीसाठी पाठवा अशा सुचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सर्वप्रथम राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे पूरग्रस्त भागात भेट दिली. यावेळी त्यांनी पाहणीसाठी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. नुकसानीची पाहणी करुन शेतकरी यांच्यासोबत संवाद साधला. राजेंद्र लटारे या शेतकऱ्याच्या शेतीची आणि गावाशेजारून जाणाऱ्या नदीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. यावेळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात आपबीती विचारली.
आपली दहा एकर शेती पूर्णपणे खरडून गेली आहे. यात कपाशी, सोयाबीन तूर पिकांचे नुकसान तर झालेच पण विहीर ही खचली असून शेतातील ड्रीप सुद्धा वाहून गेली. त्यामुळे झालेले नुकसान भरपाई देण्याची मागणी राजेंद्र लटारे या शेतकऱ्याने केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी अजित पवार यांना निवेदनही दिली आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस राळेगाव तालुक्यात पडला असल्यामुळे शेतकर्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिले.
जिल्हाध्यक्ष बदला : मारेगाव राष्ट्रवादीची मागणी
सक्षम नेतृत्व नसल्याने जिल्ह्यात पक्षाची वाटचाल अधोगतीकडे होत आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत केवळ सहा नगरसेवक विजयी झाले. निवडणूक जाहीर झाल्यानंतरही जिल्हाध्यक्षांनी बैठक घेतली नाही. केवळ माजी आमदार संदीप बाजोरीया यांनी मदत केली. या व्यतिरिक्त पक्षाकडून मदत झालेली नाही. जिल्हाध्यक्ष पुसदमध्ये असतात. त्यामुळे तीनशे किलोमीटरवर असलेल्या वणी विधानसभा मतदारसंघाकडे त्यांचे लक्ष नसते. परिणामी समस्यांचे निराकरण होत नाही. त्यामुळे नवीन जिल्हाध्यक्ष निवडण्यात यावा, असे निवेदन मारेगाव, राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार यांना देण्यात आले.
विश्रामगृहावरील बॅनरने वेधले लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन गट सर्वश्रुत आहेत. पक्षाच्या होणाऱ्या विविध कार्यक्रमांमधून या दोन गटातील मतभेद सातत्याने समोर येत आहेत. अशातच पक्षाचे प्रमुख नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांचा मुक्काम असलेल्या विश्राम भवनासमोर आणि त्यांचा ताफा येणार असलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी ‘आमचं ठरलयं’ असे लिहिलेले फलक लावण्यात आले आहे. ऐन अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान लावलेले हे फलक राजकीय वर्तुळात सध्या चांगलाच चर्चेचे विषय ठरले आहे.
चार दिवसांमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करा
यवतमाळ
अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे दीड लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यंदाचा खरीप हंगाम पूर्णत: वाया गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पुढील चार दिवसांत पंचनामे करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी दिले. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून संततधार पाऊस सुरू आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहे. बहुतांश प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे.
त्यामुळे पाण्याचा विसर्ग नदी पात्रात केल्या जात आहे. असे असताना बऱ्याच गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हयात एकूण बाधित क्षेत्र एक लाख ५० हजार ८०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यापैकी एक लाख १४ हजार ८७९ हेक्टर क्षेत्राचे संयुक्त पंचनामे पूर्ण झाले आहेत. अंदाजे ७६.१७ टक्के पंचनामे पूर्ण झाले. दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरूवार, दि. २९ जुलै रोजी ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आदी जण उपस्थित होते. प्रत्यक्ष पंचनामे केल्यानंतर प्राथमिक अंदाजात कळवलेले क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता बघता उर्वरित पंचनामे पुढील चार दिवसात पूर्ण करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी सुद्धा पंचनामे पूर्ण करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.