आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुगार अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर सरपंचासह नागरिकांनी हल्ला चढविला. ही धक्कादायक घटना उमरखेड तालुक्यातील जेवली मथुरानगर येथे रविवार, दि. ३१ जुलैला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. यात चार पोलिस कर्मचारी जखमी झाले असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सरपंचासहित इतर हल्लेखोर फरार असून त्यांचा पोलिस शोध घेत आहे.
उमरखेड तालुक्यातील जेवली मथुरानगर येथील जगदेवराव साबळे यांच्या घरी जुगार सुरु असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून रविवारी रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनात बिटरगाव ठाणेदार भोस यांनी पोलिस उपनिरीक्षक कपिल म्हस्के, जमादार विद्या राठोड, अतिश जारंडे, मोहन चाटे, गजानन खरात यांचे एक पथक त्या ठिकाणी कारवाई करीता पाठवले. दरम्यान पोलिसांनी त्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या धाडीत १२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी जुगारींना ताब्यात घेत पंचनामा सुरू असतांना सरपंच भेरलाल साबळे यांनी ‘मी गावचा सरपंच आहे, माझ्या परवानगी शिवाय तूम्ही धाड कशी टाकली’ असे म्हणत जमाव जमविला.
यावेळी जुगार खेळणारे तसेच गावकऱ्यांनी पोलिस पथकासोबत हुज्जत घालीत लाठ्या -काठ्यांनी हल्ला चढविला. चार पोलिस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या प्रकरणी महिला पोलिस जमादार विद्या राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिटरगाव पोलिस ठाण्यात जुगारींसह हल्लेखोरांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांनी घटनास्थळावर रात्रीला भेट देवुन प्रकरण हाताळले. या प्रकरणी पोलिसांनी जगदेवराव साबळे, साहेबराव साबळे यांना ताब्यात घेतले असून न्यायालयाने तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.