आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट नोटा:दोनशेच्या बनावट नोटा बाळगून विक्री करणाऱ्या चौघांना अटक; एलसीबी पथकाची पांढरकवडा मार्गावर कारवाई, 96 हजारांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट भारतीय चलन बाळगून त्याची शहरात विक्री करणाऱ्या चौघांना एलसीबी पथकाने अटक केली. ही कारवाई शहरातील पांढरकवडा मार्गावर मंगळवार, दि. १० मे रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली असून ९६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सय्यद वसीम सय्यद जमील वय २३ वर्ष बिलाल नगर, कोहिनूर सोसायटी, वसीम शहा उर्फ मुन्ना अहेमद शहा वय २७ वर्ष रा. पाटील ले-आऊट, दानीश शहा तयब शहा वय १९ वर्ष रा. सुंदर नगर, भोसा आणि शाकीब हमीद अकबानी वय २१ वर्ष रा. मेमन कॉलनी, यवतमाळ अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

शहरातील काही युवक खऱ्या नोटांच्या बदल्यात २०० रूपयाच्या दुप्पट बनावट नोटा विक्री करीत होते. तसेच मंगळवारी ते युवक पांढरकवडा परिसरात त्या नोटा विक्री करण्याकरिता येणार होते. याबाबतची गोपनीय माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना मिळाली. त्यावरून मंगळवारीच रात्री एलसीबीचे एक पथक तयार करून पांढरकवडा मार्गावर सापळा रचण्यात आला. यावेळी सय्यद वसीम सय्यद जमील, वसीम शहा उर्फ मुन्ना अहेमद शहा आणि दानीश शहा तयब शहा आदी तिघे संशयास्पद हालचाली करतांना पोलिसांना आढळून आले. यावेळी त्या तिघांची विचारपूस करीत अंगझडती घेण्यात आली असता, ८९ नग २०० रूपये किमतीच्या बनावट नोटा मिळून आल्या. तसेच याबाबत कसून चौकशी करण्यात आली असता, या नोटा शाकीब हमीद अकबानी याच्या असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान शहरातील मेमन कॉलनीतील शाकीब हमीद अकबानी याला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्याकडून देखील १९ नग २०० रूपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी त्या बनावट नोटाचे निरिक्षण केले असता नोटांचा रंग काही ठिकाणी फिक्कट तर काही ठिकाणी गडद होता. तसेच नोटांचा कागद हा खऱ्या नोटांच्या तुलनेत अत्यंत साधा असून नोटावर कोठेही सिक्युरीटी मार्क नसल्याचे आढळून आले.

या कारवाईत पोलिसांनी १०८ नग २०० रूपयांच्या नोटा, दोन दुचाकी, चार मोबाईल असा एकूण ९६ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई एलसीबी प्रमुख पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक गणेश वनारे, विवेक देशमुख, पोलिस उपनिरीक्षक योगेश रंधे, सागर भारस्कर, कर्मचारी बंडु डांगे, महंमद चव्हाण, हरिष राऊत, नीलेश राठोड, विनोद राठोड, सुधीर पिदुरकर, किशोर झेंडेकर, महेश नाईक, सलमान शेख, मोहम्मद भगतवाले, धनंजय श्रीरामे, जितेंद्र चौधरी यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...