आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाइपलाइन लीक:50 फुटाच्या अंतरात चार-चार लीकेज

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात अमृत योजनेअंतर्गत टाकलेल्या पाइपलाइन ठिकठिकाणी लीक होत आहे. या पाइपमधून पिण्याचे लाखो लिटर शुद्ध पाणी चक्क रस्त्यावर वाहत आहे. काही परिसरात तर पन्नास फुटाच्या रस्त्यात चार-चार ठिकाणी पाइपलाइन लीक झालेली आहे. असे असतानाही त्यासंदर्भात ठोस उपाययोजना जीवन प्राधिकरणाकडून राबवण्यात येताना दिसत नाही.

शहरात अमृत शहर योजनेअंतर्गत नवीन नळ योजनेचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. या योजनेअंतर्गत शहरातील अंतर्गत परिसरात सुमारे ६०० किमी. अंतराची नवी पाइपलाइन टाकली आहे. कंत्राटदारांनी सुमारे दोन वर्षांपूर्वीपासून सुरू केलेले हे काम वर्षभरापूर्वीच संपलेले आहे. मात्र त्यानंतर बऱ्याच महिन्यांचा कालावधी उलटल्यावर आता या काही महिन्यांपूर्वी या पाइपलाइनमधून पाणी सोडण्यात येत आहे.

पाणी सोडल्यानंतरही पाइपलाइन शेकडो ठिकाणी लीक असल्याचे दिसून येत आहे. पाइपचे जोड उखडत असल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर पाण्याचे पाट वाहत आहेत. विशेष म्हणजे पाण्यासाठी मोठा खर्च करून शुद्ध केलेले हे पाणी आहे. इतकेच नव्हे तर या पाइपलाइनवरून घरोघरी दिलेल्या नळ जोडण्यासाठी देखील प्लास्टिकचे पाइप वापरले आहेत. हे प्लास्टिक पाइप दुसऱ्या पाइपलाइनला ज्या ठिकाणी जोडण्यात येतात त्या ठिकाणावरून पाणी लीक होऊन ते बाहेर पडत आहे.

त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाइपलाइन लीक झाल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी पाइपमधून पाणी लीक होऊन बाहेर येते त्याच ठिकाणावरून बाहेरची घाण पाइपमध्ये जाऊन पाण्यात मिसळते. त्यामुळे लीक पाइपमुळे दूषित पाण्याचा पुरवठा घरोघरी होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामु नागरिक त्रस्त झाले आहेत.

पाइपलाइन लीक असल्याची माहिती जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर कित्येक दिवस त्याची डागडुजी करण्यात येत नाही. मनुष्यबळ नाही किंवा ठेकेदार नाही ही ठरलेली कारणे त्यासाठी पुढे करण्यात येतात. मात्र या दिरंगाईमुळे दरदिवशी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय सुरू असतो. ही बाब अतिशय गंभीर असून, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

पाइप तपासणीचा अहवाल अप्राप्त
वारंवार लीक होणाऱ्या पाइपलाइनमुळे पाइपच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे या पाइपचे नमुने व्हीएनआयटी नागपूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. या पाइपच्या तपासणीचा अहवाल मात्र अद्याप प्राप्त झाला नाही. या अहवालाकडे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह इतरांचे लक्ष लागले आहे.

हद्दवाढ परिसरातील नागरिकांना अधिक त्रास
नगर पालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर पालिकेत समाविष्ट केलेल्या ग्रामीण परिसरात पाइप लीक होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. काही भागात तर एकाच रस्त्यावर चक्क पाच-पाच ठिकाणी पाइप फुटलेले दिसतात. त्याचा त्रास मात्र या भागात राहणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...