आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट एफडीआर प्रकरण:जिल्हा बँकेच्या संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; जि. प. अभियंत्याच्या तक्रारीवरून कारवाई

यवतमाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जि. प. चा एक कंत्राट मिळवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला हाताशी धरुन बनावट एफडीआर (सुरक्षा ठेव) तयार करुन घेणाऱ्या बँकेच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजीव येल्टीवार रा. दिग्रस (पाटण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकाचे नाव आहे. जि. प. च्या कामाचे कंत्राट मिळवण्यासाठी संबंधित संचालकाने बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला हाताशी धरुन बनावट एफडीआर तयार केले होते. जि. प. बांधकाम विभाग क्रमांक १ यांच्या निविदा प्रकरणात अतिरिक्त सुरक्षा रक्कम म्हणून जिल्हा बँकेच्या पाटण शाखेतील १८ लाख १० हजार रुपयांच्या सुरक्षा ठेवीच्या १६ बनावट पावत्या तयार करुन त्या बांधकाम विभागात देण्यात आल्या.

ही बाब लक्षात येताच वणीचे आ. संजीव रेड्डी बोदकुलवार यांनी प्रधान सचिवांकडे तक्रार केली होती. त्यानंतर जि. प. बांधकाम विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रमोद राऊत यांनी पाटण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर सुमारे ४ महिने तपास केल्यानंतर पाटण पोलिसांनी अखेर राजीव येल्टीवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे जिल्हा बँकेचे संचालक आणि अधिकारी यांच्यात खळबळ निर्माण झाली असून आता या प्रकरणात बँक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.