आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श निर्माण:नि:शुल्क रुग्णसेवेेत डॉ. पटेल यांनी नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण केला

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय क्षेत्राचे झपाट्याने व्यावसायिकरण होत आहे. अशा काळात सामाजिक हेतूने प्रेरित होऊन ग्रामीण भागात गेली ४२ वर्षे कान, नाक, घसा तपासणी व उपचार शिबिरांतून नि:शुल्क रुग्णसेवा करणारे येथील डॉ. अनिल पटेल यांनी नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी येथे केले.

बचत भवनात डॉ. अनिल पटेल यांना त्यांच्या चाहत्यांनी लोकवर्गणी करून भेट दिलेल्या ईएनटी ऑन व्हिल्स या विशेष वैद्यकीय वाहनाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय रत्नपारखी, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, माजी नगराध्यक्षा कांचन चौधरी, सामाजिक कार्यकर्ते किशोर मोघे, सुरेश राठी व सत्कारमूर्ती डॉ. अनिल पटेल, डॉ. गौरव पटेल आदी उपस्थित होते. येथील कान, नाक, घसा तज्ञ डॉ. अनिल पटेल हे गेली ४२ वर्षे राज्यातील कानाकोपऱ्यात वैद्यकीय शिबिर भरवून मोफत सेवा देत आहेत, ही बाब उशिरा कळली, याची खंत आहे,

मात्र त्यांचे कार्य इतरांना प्रेरणा देणारे आहे, असे जिल्हाधिकारी येडगे यावेळी म्हणाले. या सेवेदरम्यान जुळलेल्या रुग्णांसह मित्रांनी पै-पै जमा करून डॉ. पटेल यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अधिक वेगाने आणि अत्याधुनिक उपकरणांसह वैद्यकीय सेवा देता यावी यासाठी ‘इएनटी ऑन व्हिल्स’ हे वाहन भेट दिले. जवळपास १५ लाख रुग्णांना नि:शुल्क आरोग्य सेवा पुरवणे हे समर्पण व त्याग भावनेचे दुर्मीळ उदाहरण ऋषी तुल्य डॉ. अनिल पटेल यांच्यामुळे बघायला मिळाले, असे गौरवोद्गार यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी काढले. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी डॉ. पटेल पिता-पुत्राच्या या सामाजिक जाणिवेमुळे दुर्लक्षित अशा कान, नाक, घसा या आजारांबद्दल ग्रामीण भागात जागृती निर्माण आहे, असे सांगितले.

या कार्यामुळे लोकांच्या वेदना कमी करण्याचे महत्वाचे काम होत असल्याचे ते म्हणाले. या प्रसंगी डॉ. अनिल पटेल व डॉ. गौरव पटेल यांचा शाल, श्रीफळ देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबिराच्या ठिकाणी जागेची उपलब्धता, साहित्याची ने-आण यात बराच वेळ खर्च होत असल्याने, वैद्यकीय सेवेची ही बस उपयुक्त ठरणार आहे. वाहन उभे केले की, तपासणी सुरू करता येणार असल्याने रुग्णसंख्या वाढविता येणार आहे, संचालन प्रा. घनश्याम दरणे तर आभार नितीन पखाले यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...