आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंविधानाने सर्वाना समान मुलभूत अधिकार दिले आहेत. हे अधिकार तृतीय पंथीयांना सुद्धा लागू आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन शासन, प्रशासनाच्या सहकार्याने तृतीय पंथीयांचा सर्वांगीण विकास घडवून आणू असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभागाने सामाजिक न्याय भवन येथे तृतीय पंथीयांचा मेळावा आयोजित केला होता, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, उपजिल्हाधिकारी निवडणूक स्नेहल कनिचे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा महिती अधिकारी मनिषा सावाळे, तृतीय पंथीयांच्या नायक गुरू, कार्यक्रम अधिकारी प्रिती दास, श्री सत्यसाई सांस्कृतिक व सामाजिक संस्थेचे चंद्रकांत पाटील उपस्थित होते. शासनाने तृतीय पंथीयांना ओळखपत्र देण्यासाठी वेब पोर्टल सुरु केले आहे. तृतीय पंथीयांना या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरल्यावर त्याना लगेच ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीय पंथीयांच्या शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार यासाठी कार्यशाळा, प्रशिक्षण मेळावे घेण्यात येतील. या मेळाव्याच्या माध्यमातुन तृतीय पंथीयासाठी ही चांगली सुरुवात झाली आहे. तुमचे कोणत्याही प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नेहमीच तत्पर राहील अशी ग्वाही त्यानी यावेळी दिली. जगा आणि जगू द्या : तृतीय पंथीयांच्या प्रतिनिधी म्हणुन बोलताना मुस्कान यानी तृतीय पंथीयांच्या व्यथा व समस्या मांडल्या. समाजाचा तृतीय पंथीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. समाजातील इतर लोकांप्रमाणे आम्हालाही जगण्याचा अधिकार असल्याचे त्यानी अधोरेखित केले. सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी तृतीय पंथीयांसाठी वेगळे शौचालय असायला हवे. वृद्ध लोकांना बसमध्ये अर्धे तिकिट, हक्काचा निवारा, रुग्णालयात वेगळी खोली, नोकरित आरक्षण, राजकारण व शिक्षणात आरक्षण, व्यवसायाधिष्ठीत प्रशिक्षण तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे समाजात प्रतिष्ठा मिळायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी तृतीय पंथीयांना ओळख पत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रामाचे संचालन प्रा. कमल राठोड यांनी केले तर आभार भाऊराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.