आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापांढरकवडा पंचायत समितीतील साखरा खु., घोडदरा ग्रामपंचायतीत तब्बल ३३ लाखांचा अपहार झाला. या प्रकरणात ग्रामसेवकास शोकॉज नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित ग्रामसेवक विद्यमान प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांसोबत एकाच रूममध्ये राहतात. त्यामुळे त्या दोघांनी संगनमत करून निलंबन करण्याची धमकी दिल्याची तक्रार विस्तार अधिकारी मुरलीधर भगत यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली.
पांढरकवडा पंचायत समितीत गेल्या पाच वर्षांत ९ गटविकास अधिकारी, तर पाच सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. यात तक्रारकर्ते मुरलीधर भगत दोन वर्ष सहाय्यक गटविकास अधिकारी, आणि गेल्या पाच वर्षांपासून विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहे. गेल्या ५ वर्षांपासून ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी चालू आहे. अशात साखरा खु., घोडदरा ग्रामपंचायतींच्या दप्तराची तपासणी केली असता, ३३ लाख २१ हजार ९६ रुपयांची अनियमितता तसेच अफरातफर आढळून आली. या प्रकरणाचा चौकशी अहवाल पांढरकवडा पंचायत समिती कार्यालयात सादर केला. तत्पूर्वी ग्रामसेवक डी. एन. लढे यांना ७ एप्रिल रोजी शोकॉज नोटीस बजावण्यात आली होती. दरम्यान, प्रभारी गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकाऱ्यांना निलंबनाची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे व्यथीत होवून मुरलीधर भगत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून चौकशी करावी आणि दोषी विरोधात कारवाई करावी, अशी मागणी भगत यांनी तक्रारीतून केली आहे.
साखरात १२ लाख ७४ हजारांची अफरातफर
साखरा खू. ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक डी. एन. लढे यांनी सन २०२०-२१ आणि २०२१-२२ मधील एकत्रीत रकमेची खर्च पावत्या नाही. यात साखरा खू. १४ व्या वित्त आयोगातून ७ लाख ६४ हजार २९२ रूपये, सामान्य निधी ७९ हजार १०३, पेसा ५ टक्के अबंध निधी ४ लाख ३० हजार ४०० रूपये, अशी सर्व योजनेची १२ लाख ७४ हजार ३५५ रुपयांची अनियमितता आढळून आली आहे.
घोडदरा येथे २० लाखांची अनियमितता
तालुक्यातील घोडदरा ग्रामपंचायतीत १४ व्या वित्त आयोगातून पाच लाख ८० हजार ८०९, सामान्य निधी ५ लाख १८ हजार ८०५, पाणी पुरवठा निधी १७ हजार ५८०, पेसा ५ टक्के अबंध निधी ९ लाख २९ हजार ४६७, असे मिळून २० लाख ४६ हजार ६६१ रुपयांची अनियमितता आढळून आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.