आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसने पालकत्व:पालकमंत्री संदीपान भुमरे घेणार यवतमाळचा आढावा औरंगाबादेत; बैठकीला उपस्थित राहण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील विविध विकासात्मक कामांचा आढावा पालकमंत्री संदीपान भुमरे चक्क औरंगाबाद येथे घेणार आहेत. शुक्रवार, दि. ८ एप्रिल रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या बैठकीत महसूल, जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी माहिती गोळा करण्याची लगबग सुरू केली. एका दिवसाच्या बैठकीमुळे जिल्ह्यातील शुक्रवारचे कामकाज पूर्णत: ठप्प पडणार हे मात्र निश्चित.

जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा वनमंत्री संजय राठोड यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तद्नंतर जवळपास दीड महिना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून अनेक प्रकारचे तर्कवितर्क लावल्या जात होते. मात्र, १६ एप्रिल २०२१ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार तथा राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार सोपवण्यात आला. तद्नंतर पालकमंत्र्यांनी आवश्यकतेनुसार जिल्ह्यात आढावा बैठका घेऊन काहीअंशी समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. आता आर्थिक वर्ष संपुष्टात आले असून, पालकमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळाचीसुद्धा वर्षपूर्ती झाली आहे.

अशा परिस्थितीत वर्षभरातील विकासात्मक कामे, त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीून देण्यात येणाऱ्या निधीतील कामांचा आढावा पालकमंत्री म्हणून त्यांनी घेणे क्रमप्राप्त आहे. त्या अनुषंगाने आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे, या बैठकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील संपूर्ण अधिकाऱ्यांना औरंगाबाद येथे बोलावण्यात आले आहे. परंतू ह्या आढावा बैठकीमुळे अधिकाऱ्यांमध्ये कमालीचा रोष व्यक्त केला जात आहे.

स्वीय सहायकांचा मोठ्या प्रमाणात वाढला हस्तक्षेप
पालकमंत्री मुळचे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर अधून मधून त्यांनी भेटी, बैठका घेतल्या. उर्वरीत संपूर्ण जबाबदारी स्वीय सहाय्यकांवर सोपवण्यात आली आहे. सर्वसामान्यांना पालकमंत्र्यांचे दर्शनच होत नाही. तर आवश्यक असलेल्या कामाकरिता अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांना थेट स्वीय सहाय्यकांचीच भेट घ्यावी लागते. त्यामुळे स्वीय सहायकांची लुडबूड मोठ्या प्रमाणात वाढल्याची चर्चा आहे.

आर्थिक फटका, वेळेचा अपव्यय होणार प्रामुख्याने जिल्हा नियोजन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, रोहओ, जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखांना बोलावण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आवश्यक असलेली माहिती गोळा करण्याकरता अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची लगबग सर्वच विभागात पहावयास मिळाली आहे. अधिकाऱ्यांना वेळेपूर्वीच औरंगाबाद गाठावे लागणार आहे. याकरीता आर्थिक फटका बसणार असून, वेळेचा अपव्ययसुद्धा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...