आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१६, १७ ऑक्टोबर रोजी परीक्षा:दिवाळीपूर्वी होणार रखडलेली आरोग्य विभागाची पदभरती; पूर्वी अर्ज दाखल केलेला उमेदवारच पात्र

अमोल शिंदे | यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या गट क संवर्गाच्या पद भरतीला दिवाळी पूर्वीचा मुहूर्त मिळाला आहे. परीक्षेच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सुचना शुक्रवार, दि. २६ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. संपूर्ण प्रक्रीया पार पडल्यानंतर १६ आणि १७ ऑक्टोबर ह्या दोन दिवसांत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे.

मार्च २०१९ मध्ये जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरण्यासाठी महा भरती घेण्यात आली होती. उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर शेवटच्या क्षणी पद भरतीला ग्रहण लागले होते. तेव्हापासून परीक्षा घेण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आलाच नव्हता. अशात १० मे २०२२ रोजी पद भरती घेण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या होत्या. सर्वांत महत्वाचे म्हणजे आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येणारे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक ह्या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या पदा करीता पूर्वी अर्ज दाखल केलेला उमेदवारच पात्र आहे. परीक्षा घेण्याच्या दृष्टीने सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन केला होता.

सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून परीक्षेचे वेळापत्रक निश्चित केले आहे. यात प्रामुख्याने ८ सप्टेंबर पर्यंत बिंदुनामावली अंतीम करणे, विभागीयस्तरावर १६ सप्टेंबरपर्यंत कंपनीची निवड करणे, पूर्वीच्या कंपनीकडून सहा दिवसांत म्हणजे २२ सप्टेंबर पर्यंत माहिती संकलित करून घेणे, २७ सप्टेंबरपर्यंत संवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या जिल्हा निवड समितीस कळविणे, ४ ऑक्टोबर रोजी परीक्षेच्या दृष्टीने कार्यवाही करणे, पुढील सहा दिवसांत पात्र उमेदवारांना प्रवेश पत्र उपलब्ध करून देणे, तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा १५ तसेच १६ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. पुढील १५ दिवसांत उत्तर पत्रिका, निकाल, पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे नियोजन केले आहे. यानुसार आरोग्य विभागातील गट क संवर्गातील पद भरती होणार असून, जिल्हा परिषद प्रशासन कामाला लागले आहे.

आता पुन्हा परीक्षेची सूत्रे जिल्हा निवड मंडळाच्या हाती
मार्च २०१९ मध्ये महा भरती होणार होती. याची जबाबदारी मे. न्यास कम्युनिकेशन प्रा. लिमिटेड कंपनीवर सोपवण्यात आली होती. तर जिल्हा निवड महामंडळाला हद्दपार करण्यात आले होते. आता पुन्हा नव्या सरकारने परीक्षेची सूत्रे जिल्हा निवड मंडळाकडेच सोपवली आहे. विशेष म्हणजे डाटा आणि परीक्षा शुल्क मे. न्यास कम्युनिकेशन प्रा.लि. आणि कोकण विभागीय आयुक्त कार्यालय उपायुक्त तथा राज्यस्तरीय नोड अधिकाऱ्यांकडून घेण्याबाबत सुचविले आहे.

बातम्या आणखी आहेत...