आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात पाणी शिरल्याने नुकसान:चांदूर रेल्वे, जुना धामणगाव आणि अंजनसिंगी परिसरात मुसळधार पाऊस

चांदूर रेल्वेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. दरम्यान सोमवारी दुपारी चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे तालुक्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे चांदूर रेल्वे शहरातील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. तसेच धामणगाव रेल्वे तालुक्यातील जुना धामणगाव, अंजनसिंगी या गावांतही पावसामुळे नुकसान झाले आहे.

चांदूर रेल्वे शहरातील शिवाजी नगर परिसरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे घरातील अन्नधान्य व इतर आवश्यक साहित्याचे नुकसान झाले. या परिसरात रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. त्या पुलाच्या कडेला असलेला नाला बांधकाम विभागाने बुजवून तो न. प. च्या लहान नालीला जोडल्याने त्याचे पाणी ओव्हर फ्लो होऊन परिसरात व नागरिकांच्या घरात घुसले. याबाबत गेल्या वर्षीपासून न. प. व बांधकाम विभागाला पत्र, निवेदन देऊन कुठलीच कारवाई अधिकाऱ्यांनी केली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहे. दरम्यान पूर परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळताच चांदूर रेल्वेचे ठाणेदार विलास कुलकर्णी काही भागात पोहाेचले होते.

तात्पुरती उपाययोजना केली : दुपारीच न. प. ने जेसीबीच्या मदतीने या परिसरातील पाण्याचा मार्ग मोकळा केला. या प्रकरणी नगर अभियंत्याकडून अहवाल घेऊन उपाययोजना करता येईल. रात्रीला पाऊस झाल्यास पाणी घरात जाणार नाही, अशी तात्पुरती उपाय योजना केली असल्याचे न. प. मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी सांगितले.

अंजनसिंगी व जुना धामणगाव मंडळात ढगफुटी सदृश पाऊस :
तालुक्यातील अंजनसिंगी व जुना धामणगाव मंडळात ढगफुटी सदृश पाऊस झाला. विरुळ रोंघे, मांडवा, शिरजगाव येथे प्रचंड पाऊस झाल्यामुळे विदर्भ व मंडपजरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्यामुळे नदीकाठची शेती पिकासहित खरडून गेली. या वेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी तत्काळ माहिती घेऊन व विरूळ रोंघे येथे पूर परिस्थितीची पाहणी केली. याचवेळी आ. प्रताप अडसड यांनीसुद्धा अतिवृष्टीग्रस्त भागाची प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पाहणी केली. जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून तातडीने मदत करण्याचे निर्देश आ. प्रताप अडसड यांनी दिले.

पाहणी करून कायमची उपाययोजना करणार
परिसरातील नागरिकांकडून माहिती मिळाली. एका मीटिंगमुळे पाहणीसाठी आज जाता आले नाही. परंतु मंगळवारी त्या परिसरात घटनास्थळ पंचनामा करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंदर्भात निर्णय घेऊ.
- इब्राहिम चौधरी, उपविभागीय अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...