आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदी-नाल्यांना पूर:यवतमाळ येथे विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस; सरासरी ओलांडली

यवतमाळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवार, दि. ११ सप्टेंबर रोजी पहाटेपासून संपूर्ण जिल्ह्यात हजेरी लावली. विजांच्या कडकडाटात झालेल्या मुसळधार पावसामुळे छोट्या, मोठ्या नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे नाल्याला आलेल्या पुरात एक ४० वर्षीय शेतमजूर वाहून गेला. वाघू शेषराव रणमले असे वाहून गेलेल्या व्यक्तिचे नाव असून, रविवारी सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा अधिक पाऊस कोसळला. सततच्या पावसामुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत जिल्ह्यातील दीडशेहून अधिक महसुली मंडळातील ३ लाख ७८ हजार ४६१ शेतकऱ्यांच्या तीन लाख ८९ हजार ५५८ हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर यांसह बहु-वार्षीक पिकांचे नुकसान झाले. तर ३० ऑगस्ट रोजी लोहणबेळ, रूंझा आणि वरध या तीन महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. अधून-मधून येणाऱ्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना यंदा लागवडीचा खर्च सुद्धा निघणार की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, शनिवारी मध्यरात्रीपासून सुसाट वाऱ्यासह रिमझिम पावसाने संपूर्ण जिल्ह्यात हजेरी लावली. रविवार, ११ सप्टेंबर रोजी पहाटेपासून विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्याभरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे छोट्या, मोठ्या नदी-नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तर महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील नाल्याला आलेल्या पुराचा अंदाज न आल्याने वाघू रणमले नामक शेतमजूर वाहून गेला. याबाबत माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्याचा शोध घेतला, परंतू सायंकाळी उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. तर ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसानीसह आणखी दोन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

चाऱ्यासाठी गेलेला शेतमजूर पुरात गेला वाहून
फुलसावंगी | परतीच्या पावसाने शनिवारी रात्रीपासून संततधार सुरू केली आहे. ज्या मुळे नदी, नाल्यांना पूर आला असून, या पुरात रविवार, दि. ११ सप्टेंबर रोजी येथील वॉर्ड क्रमांक तीन मधील इसम वाहून गेल्याची घटना घडली आहे. वाघू शेषराव रणमले वय ४० वर्ष, असे वाहून गेलेल्या शेतमजुराचे नाव आहे. बकरीचा चारा आणण्यासाठी सिंचन विभागाच्या बंधाऱ्याच्या पुरातून गेलेला शेतमजूर वाघू शेषराव रणमले वाहून गेला. प्रथमदर्शनी नागरिकांनी आरडाओरडा केली. नागरिकांनी सदर इसमाला शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. वृत्त लिहिपर्यंत त्याचा वाघू रणमले यांचा शोध लागला नव्हता.

आठरीचा नाला ओव्हरफ्लो; वाहतूक ठप्प
ढाणकी । परतीच्या पावसाने शनिवारी मध्यरात्रीपासून झोडपणे सुरू केले. रविवार, दि. ११ सप्टेंबर रोजी पर्यंत पावसाचा कहर सुरू होता. त्यामुळे आठरीचा नाला ओव्हर फ्लो झाला होता. पुलावरून अंदाजे दोन ते तीन फुट पाणी वाहू लागल्याने तब्बल चार तास वाहतूक ठप्प पडली होती. मागिल १५ दिवसांच्या उघडीप नंतर परतीच्या पावसाने हजेरी लावली. तीव्र उन्हाच्या दाहकतेने पिकांना फटका बसत होता. बळीराजाच्या चिंतेत वाढ दिसत होती. तुरळक पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आणि पिकांना नवसंजीवनी मिळाली. अशात आठरीचा नाल्याला पूर परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी, ढाणकी-बिटरगाव मार्ग तास बंद होता. साधारणत: चार तास वाहतूक ठप्प होती.

जिल्ह्यात ९७२ मिमी. पाऊस
जून महिन्याच्या सुरूवातीला काही दिवस पावसाने हजेरी लावली नव्हती. मात्र, महिन्या शेवटच्या आठवड्यापासून सलग पाऊस सुरू आहे. आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत ९७३.९ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आणखी काही दिवस पाऊस असाच सुरू राहिल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हाती काहीच पीक लागणार नसल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...