आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनादेश वाटप:पाच तालुक्यांतील 95 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिला मदतीचा हात; ‘नाम’चे भरीव कार्य

पुसद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाम फाऊंडेशन’आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला मदत तर करतेच, सोबतच शेतकरी आत्महत्या कशा रोखल्या जातील यासाठी भरीव असे योगदान देऊन शासन-प्रशासनास मदत करीत आहे, असे प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा पुसदचे उपविभागीय अधिकारी सावनकुमार यांनी केले.

येथील गुणवंतराव देशमुख विद्यालयात पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस व दारव्हा या पाच तालुक्यांतील ९५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये सानुग्रह धनादेश वितरण करण्याच्या कार्यक्रमात सावनकुमार बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पुसदचे तहसीलदार राजेश चव्हाण, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. आशिष देशमुख उपस्थित होते.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतांना शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या ही देशाला लाजिरवाणी बाब असून अशा कठीण प्रसंगी त्यांच्या सोबत उभे राहण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनच्या वतीने विदर्भ खान्देश समन्वयक हरीश इथापे यांच्या प्रयत्नातून आणि यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन पवार यांच्या मार्गदर्शनात पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस आणि दारव्हा या पाच तालुक्यांतील ९५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये सानुग्रह राशीचे धनादेश वाटप मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात नाम फाउंडेशनचे पुसद उपविभागीय समन्वयक स्वप्निल देशमुख यांनी प्रस्ताविकेतून नामचे उद्देश आणि कार्याची विस्तृत माहिती सांगून नाम अंतर्गत मिळालेल्या निधीचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी आणि लघुउद्योग उभारण्यासाठी करावा असे आवाहन केले. यावेळी नामचे धनंजय देशमुख, पवन देशमुख, सुरेश आढाव, अनिल दामोदर, संजय रेक्कावार, उमरखेड समन्वयक दीपक ठाकरे, दिग्रस समन्वयक रवींद्र राऊत, महागाव समन्वयक प्रल्हाद कदम, गजानन पवार, दारव्हा समन्वयक देवेंद्र राऊत हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी किरण देशमुख सवणेकर, सुभाष राठोड, अमोल उबाळे, हरगोविंद कदम, तात्या नाईक, अमोल दामोधर, यशवंत देशमुख, यांचेसह संवेदना सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन ग्राम गीताचार्य गणेश धर्माळे, तर आभार गणेश शिंदे यांनी मानले.

शेतीविषयी अडचण असल्यास अर्ज करा
पारंपरिक पद्धतीने शेती न करता सुधारित शेती करून जोडधंदा करा, कुटुंब प्रमुख मानसिक तणावात असेल तर त्याला आधार ध्या, शेती व शेतीविषयक कोणतीही अडचण असल्यास अर्ज करा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सावनकुमार यांनी केले आहे.

मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी मदत
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला नाम फाउंडेशनने केलेली मदत ही माझ्या मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी उपयोगी ठरणार आहे, सर्वांनी ही मदत महत्वाच्या आवश्यक कामासाठी सदुपयोगी लावावी, असे प्रतिपादन गुंज येथील सोनाली टेमकर यांनी केले आहे,

बातम्या आणखी आहेत...