आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळंब शहराला लागून असलेल्या यवतमाळ मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाजवळ अनेक महिन्यापासून दुर्गंधी पसरली असून या संदर्भात नागरिकांनी यापूर्वीच्या नगरपंचायत मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे अभियंता यांना निवेदन देऊन सुध्दा काहीच फरक पडला नसल्याने दि. २८ फेब्रुवारीला नगरपंचायतच्या सत्तेतील नगरसेवकांसह विरोधी गटाच्या नगरसेवकांना निवेदन द्यावे लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. शहरातील नागरिकांनी नगरपंचायत मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांना निवेदन देणे रास्त आहे. पण सत्तेतील नगरसेवक पदाधिकारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांचा गळ्यात गळा घालण्याचा प्रकार सुरु झाला आहे. तर सात दिवसात दुर्गंधी बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
येथील माथा वस्तीला लागून छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुल असून माथा वस्तीमधील दारुच्या सडव्याचे घाण पाणी पुलाजवळ खड्ड्यामध्ये साचून दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी नागरिकांना उभे राहणेही कठीण होत आहे. नगरपंचायत प्रशासनाने येथे साचत असलेल्या दूषीत पाण्याची विल्हेवाट लावावी, यासाठी विरोधी गटाच्या नगरसेवकांनी निवेदन देणे ठिक असले तरी सत्ताधाऱ्यांनी त्यावर सह्या मारुन निवेदन दिले. हा शहरवासीयांसाठी चिंतनाचा विषय आहे.
सदर निवेदन पहाता शहरवासीयांनी न्याय मागायचा कुणाला अशी शहरात चर्चा सुरु आहे. यावेळी नगरसेविका सुनिता प्रविण निमकर, पंचशिला भेले, नगरसेविका डी. डी. तुमकड, नगरसेवक खुशाल बोकडे, रुपेश राऊत, सागर समुद्रे, आशिष धोबे, अ. अजिज अ. सत्तार, प्रवीण निमकर, सुरज एकनार, आकाश भिसे, मारोती भोयर, संजय पवार, करण मोरे, पीयूष शिंदे, राजु बुल्ले, रफीक खान, शहजाद शेख करीम यांच्यासह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन नगरपंचायत मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.