आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपयश:2018 मध्ये हागणदारीमुक्त  जिल्ह्यामध्ये दिवसागणिक वाढतेय टमरेलधारकांची संख्या; 22 हजार 927 जण आढळले, साडेअकरा हजारांवर जणांना केले शौचालयाचे बांधकाम

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सन २०१८ मध्ये हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. असे असले तरी जिल्ह्यात दिवसागणिक टमरेलधाऱ्यांची संख्या वाढत आहे. बेसलाईनमध्ये सुटलेल्यांचा सर्वे करण्यात आला असून, ह्यात नव्याने २२ हजार ९२७ जण टमरेलधारी आढळले आहेत. अशा लाभार्थींना शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. यातील जवळपास अकरा हजार ४४९ जणांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे.

जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक नागरिकांच्या घरी शौचालय नव्हते. परिणामी, त्यांना उघड्यावर शौचास जावे लागत होते. या कारणामुळे रोगराईला आमंत्रण मिळत होते. अशा लाभार्थींना शौचालय बांधकामाकरीता प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

यातून गोदरीमुक्त जिल्हा करण्याच्या दृष्टीने पावले उचलले. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली. वेगवेगळ्या स्वरूपाचे उपक्रम राबवण्यात आले. तद्नंतर शौचालय बांधकाम करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्यास सुरूवात झाली.

आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख २४ हजार ९३९ नागरिकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. बेसलाईनमध्ये नोंदणीकृत असलेल्या लाभार्थींच्या घरी शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यामुळे सन २०१८ मध्ये जिल्हा हागणदारीमुक्त घोषीत करण्यात आला.

दरम्यान, राज्यस्तरावर जिल्ह्याचा सन्मान सुद्धा करण्यात आला होता. तरीसुद्धा शौचालय नसलेल्यांचे सर्वेक्षण स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून चालूच होते. या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात २२ हजार ९२७ लाभार्थींकडे शौचालय उपलब्ध नसल्याचे उघडकीस आले. अशा लाभार्थींकडून शौचालयाबाबतचा अर्ज घेऊन त्यांना स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून प्रोत्साहन अनुदान देण्यात आले. त्याचप्रमाणे शौचालय असलेल्यांना वापर करण्याच्या दृष्टीने जनजागृती, मार्गदर्शन करण्यात आले. तद्नंतर संबंधित लाभार्थींना शौचालयाच्या बांधकामाकरीता प्रोत्साहन निधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सध्या ११ हजार ४४९ टमरेलधाऱ्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले असून, त्यातील दहा हजार ८७ लाभार्थींना १२ हजार रूपये प्रमाणे प्रोत्साहन अनुदान सुद्धा वाटप करण्यात आले आहे. प्रोत्साहन अनुदान वाटप केलेल्या मध्ये आर्णी ७०१, बाभूळगाव ९१७, दारव्हा एक हजार ६०७, दिग्रस ७९५, घाटंजी ५७०, कळंब २१३, केळापूर ५४३, महागाव ३५५, मारेगाव ६६०, नेर ३२१, पुसद ५९०, राळेगाव ६३९, उमरखेड ७०५, वणी ४६५, यवतमाळ ७२६, झरीजामणी २८०, असे मिळून १० हजार ८७ लाभार्थ्यांचा समावेश आहे. उर्वरीत लाभार्थींची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...