आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणघातक हल्ला:उमरखेड शहरात टोळी युद्धाने काढले डोकेवर; धारदार शस्त्राने तिघांवर केला प्राणघातक हल्ला

उमरखेड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणामुळे तिघांवर पाळत ठेवीत अज्ञात तरुणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास महागाव रस्त्यावरील राजस्थानी भवनासमोर घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरात गँगवॉर निर्माण झाल्याने शहरवासियात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रघु डाबोडे वय १८ वर्ष, सरु पथ्रोड वय २४ वर्ष आणि विनोद धोतरे वय २५ वर्ष सर्व रा. नाग चौक, उमरखेड अशी जखमींची नावे आहे.

या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार, शहरातील एका लग्नसमारंभात किरकोळ कारणावरून रघु डाबोडे, सरु पथ्रोड आणि विनोद धोतरे या तिघांशी विरोधी टोळीच्या काही जणांसोबत शाब्दिक वाद झाल्याचे समजते. या वादाचा बदला घेण्यासाठी त्या तिघांवर अज्ञात टोळक्यांनी पाळत ठेवली. सोमवारी मध्यरात्री रात्री १२ वाजताच्या सुमारास त्यांना महागाव रस्त्यावरील राजस्थानी भवन समोर गाठून धारदार शस्त्राने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून टोळके पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या या तिन्ही युवकांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी मदत करीत रुग्णालयात पोहोचवले असल्याची माहीती मिळाली. गंभीर जखमी युवकांना पुढील उपचारासाठी घटनेचे गांभीर्य ओळखून ताबडतोब यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तिघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून ते तिघेही दोन दिवस पोलिसांना जबानी देण्याच्या परिस्थितीत नसून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होत असल्याची माहीती बयान नोंदवण्यासाठी ठाण मांडून असलेल्या पोलिस उपनिरिक्षक सुजाता बनसोड यांनी दिली. या घटनेमुळे मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज
मागील दोन वर्षात घडणाऱ्या गुन्हेगारी वर्तुळातील घटनांवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ हे लक्ष ठेवून आहे. देखील यवतमाळ पाठोपाठ आता उमरखेडातही तरुणवर्ग गुन्हेगारीकडे वळत असल्याने उमरखेड शहरावर त्यांनी लक्ष घालून गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळेच्या आतच जेरबंद करीत कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

पोलिसांनी गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे
राजकीय वरदहस्त टिकून ठेवण्यासाठी काही शहरातील राजकीय नेते मंडळी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांना हाताशी धरून त्यांना प्रोत्साहन देत असल्याने अशा घटना वारंवार उमरखेड शहरात घडत आहेत. यावर देखील पोलिस प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...