आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:उमरखेड येथे सख्ख्या भाच्यानेच मामाच्या घरात मारला डल्ला

उमरखेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बस स्टँड समोरील हरी ओम क्रीडा संकुल येथील रहदारीच्या मार्गावर असलेल्या एका घरात १३ डिसेंबर रोजी मोठी चोरी झाली होती. उमरखेड पोलिसांनी अवघ्या पाच दिवसात या चोरीचा उलगडा केला असून यामध्ये सख्ख्या भाच्यानेच मामाच्या घरावरच डल्ला मारल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा छडा लागल्याने उमरखेडकरांमध्ये पसरलेली धास्ती मात्र कमी झाली आहे.

उमरखेड शहरातील बस स्टॅंड समोर महामार्गावर असलेल्या तसेच पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कैलास हरिभाऊ शिंदे यांच्या घरी १३ डिसेंबरच्या रात्री चोरी झाली होती. त्यामध्ये सोने-चांदी व रोग रक्कम असा ३५ लाखांचा एवज लंपास झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी सर्व शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते.

हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांनी ठाणेदार अमोल माळवे यांना सूचना दिल्या होत्या. यावरून सर्व बाबींचा गोपनीय बातमीदार, तांत्रिक बाबींचा आधार घेऊन तसेच घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास केला होता. त्यात नवख्या चोरट्याने व फिर्यादीचे घर, घरातील वस्तू यासंबंधीचे ज्ञान असणाऱ्या व्यक्तीने चोरी केली असल्याच्या निष्कर्षावर येवुन पोलिस पोहोचले होते.

तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत देशमुख यांनी त्यांचे नातेवाईक व इतर संबंधित यांच्याकडे गुन्ह्यासंबंधी तपास करण्यास सुरुवात केली. गुन्हाच्या तपासाच्या अनुषंगाने पुरावा भेटल्यानंतर फिर्यादी कैलास शिंदे यांचा सख्खा भाचा अक्षय नामदेव ढोले वय २८ रा. सुकळी, ता. आर्णी यास २० डिसेंबर रोजी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यात त्याने घटनेच्या दिवशी वेशांतर करून चोरी केल्याची घटना कबुली दिली. यावेळी आरोपीकडून गुन्ह्यात चोरी गेलेल्या मुद्देमाला पैकी ९० टक्के मुद्देमाल व नगदी १९ हजार रुपये जप्त करण्यात आले असून उर्वरित मुद्देमाल व रक्कम हस्तगत करण्याकरता पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार अमोल माळवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत देशमुख, संदीप ठाकूर, कैलास नेवकर, नितीन खवडे, अतुल तागडे तसेच सायबर सेल यवतमाळ येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक मुंडे, अंमलदार यांनी केली.

तपास पथकाला प्रोत्साहनपर बक्षीस
उमरखेड येथे झालेल्या धाडसी चोरीमुळे सर्वत्र दहशत पसरली होती. पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरलेल्या या प्रकरणाच्या तपासामध्ये योग्य पद्धतीने तपास करुन गुन्हा उघडकीस आणणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदार यांना बक्षीस जाहीर झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी हे प्रोत्साहन पर बक्षीस जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...