आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ जिल्ह्यातील 53 मुले शाळाबाह्य:26 मुली, 27 मुलांचा समावेश; पंधरा दिवस चालले शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग आणि सर्वशिक्षाच्या वतीने मार्च महिन्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ७८ बालके आढळून आले होते. पुन्हा दुसऱ्यांदा शाळाबाह्य मुलांचा सर्वे केला असता ५३ जण ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये आढळून आले. यात २६ मुली, २७ मुलांचा समावेश आहे. या सर्व बालकांना वयोगटानुसार लगतच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे बालरक्षकांच्या माध्यमातून वर्षभर सर्वेक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वांना मोफत शिक्षण मिळावे या उद्देशाने शिक्षक हक्क २००९ अन्वये कायदा आणण्यात आला. परंतु विविध कारणांनी जिल्ह्यात ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक बालके शिकत नसल्याची धक्कादायक बाब सर्वेक्षणात उघडकीस येत आहे. गेल्या दोन वर्षांत केलेल्या सर्वेक्षणात मोठ्या संख्येने शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. यात गेल्यावर्षी १६७ बालके आढळली होती. तर या वर्षांत मार्च महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात ४२ मुली, ३६ मुले, अशी एकूण ७८ बालके आढळली होती. यंदा दुसऱ्यांदा सर्वेक्षण करण्याचे आदेश शासनस्तरावरून देण्यात आले होते. त्या अनुषंगाने ५ ते २० जुलै या कालावधीत वीटभट्टी, कारखाना, इमारती, गाव, वस्त्याची पाहणी केली. या पाहणीत ५३ बालके आढळून आली आहेत. सर्वेक्षणात आढळून आलेल्या बालकांना लगतच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. आता वर्षभर शाळाबाह्य मुलांचा सर्वे करण्याचा निर्णय झाला आहे. बाल रक्षक म्हणून शिक्षकच ग्रामीण भागात शोधमोहीम करणार आहेत.

सात दिव्यांगांचा समावेश
जिल्ह्यात १५ दिवस चाललेल्या शाळाबाह्य सर्वेक्षणात एकूण ५३ बालके आढळून आली. यातील सात बालके जन्मत: दिव्यांग आहेत. या बालकांना कुठल्याही शाळेत प्रवेश देण्यात आला नव्हता. दरम्यान, प्रशासनाने त्यांच्या पालकांची समजूत काढून नजीकच्या शाळेत प्रवेश घेण्यास बाध्य केले. हे विद्यार्थी नियमित राहावे ह्या दृष्टीने प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सुचना दिल्या.

बातम्या आणखी आहेत...