आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएक तीळ सात जणांनी वाटून खावा, अशी म्हण आहे. मात्र पुसदच्या अभिषेक सूर्यकांत रुद्रवारने एकाच तिळाचे ब्लेडच्या पात्याने चक्क शंभर तुकडे केले, तेही अवघ्या १६ मिनिटे व २० सेकंदांत. त्याच्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. अभिषेकने २० नाेव्हेंबरला ब्लेडने तिळाचे १०० तुकडे केले. त्याचा व्हिडिओ इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला पाठवला. इंडिया बुकने अभिषेकला ३१ डिसेंबरला त्याच्या विक्रमाची नोंद झाल्याचे कळवले. भविष्यात एका तिळाचे दोनशे तुकडे करण्याचा अभिषेकचा मानस आहे.
अभिषेक नांदेडच्या एमजीएम महाविद्यालयात बीएफए अंतिम वर्षात शिकत आहे. मायक्रो आर्ट हा विषय त्याला आवडतो. त्याने आजपर्यंत मोहरी, तांदूळ, हराळी, सुपारी, खडू, पेन्सिल, काडेपेटी यावर गौतम बुद्ध, गणपतीचे चित्र रेखाटले आहे. एक इंच कागदावर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा लिहिली आहे. सावित्रीबाई फुले जयंतीला अभिषेकने चनाडाळवर त्यांचे चित्र रेखाटले होते. यापूर्वी त्याने तिळावर इंग्रजी मुळाक्षरे व एक ते १०० पर्यंत अंकही लिहिले आहेत. पेन्सिलच्या टोकावर त्याने सूक्ष्म कलेतून माहूरची रेणुकादेवी व कोल्हापूरची देवी साकारली आहे. त्याने तांदळाच्या दाण्यावर झेंडादेखील कोरला आहे. त्यासोबतच दर संक्रांतीला तांदळाच्या दाण्यावर पतंग काढतो. यात विशेष बाब म्हणजे अक्षरांमधून गणपतीचे रूप तो सहजतेने साकारतो. त्याने तयार केलेल्या अक्षररूपी गणपतीचे चित्र मनाला प्रसन्नता देते. त्याचीही इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्याचा आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचा मानस आहे. त्याचा नुकताच बाबासाहेब नाईक चित्रकला महाविद्यालयात सत्कार झाला.
पानावर निसर्गरंग भरणे आवडते
मी तिळाचे एवढे सूक्ष्म तुकडे करूनही ते उघड्या डोळ्यांनी पाहता येतात. मला आजोबा कृष्णा नाना नालमवार व आजी लीला यांच्याकडून प्रोत्साहन मिळते. त्यांच्या कलाचे अनेक कंगोरे आहेत. रुपयाच्या नाण्यावर विविधरंगी निसर्गचित्र रेखाटणे, आपट्याच्या पानावर सुरेख निसर्गरंग भरणे हा छंद मी जोपासत आहे. - अभिषेक रुद्रवार, पुसद
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.