आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा योजना:78 गाव पाणीपुरवठा योजनेवर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याची सूचना

नांदगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रकल्प सल्लागार नेमण्याची आमदार कांदे यांची मागणी पूर्ण नांदगाव, मालेगाव आणि देवळा तालुक्यातील गावांचा समावेश

नव्याने मंजूर करण्यात आलेल्या ७८ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी खासगी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची मागणी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आमदार सुहास कांदे यांनी केली. या मागणीची तत्काळ दखल घेत मंत्री पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवांना ७८ खेडी पाणीपुरवठा योजनेवर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या.

गिरणा धरणातून नांदगाव शहर आणि तालुक्यातील ५६ गावांना पाणीपुरवठा करणारी पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाली होती. जलवाहिन्या जुन्या झाल्याने पाणी गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. ती वारंवार फुटत असल्याने पाणीपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांचा पाणीपुरवठा सुरळीतपणे ठेवण्यासाठी मोडकळीस आलेल्या ५६ खेडी योजनेचे नूतनीकरण व विस्तार करण्याची गरज निर्माण झाली होती.

आमदार सुहास कांदे यांनी प्रारंभीपासूनच योजनेचा विस्तार आणि नूतनीकरण करण्यासाठी शासनदरबारी नेटाने पाठपुरावा केला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सादर करण्यात आलेल्या ७८ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावास राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने नुकतीच मंजुरी दिली होती. योजनेला मंजुरी मिळाली असल्याने आमदार सुहास कांदे यांनी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत या या योजनेचे काम जलद आणि चांगल्या पद्धतीने मार्गी लागण्यासाठी खासगी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याची मागणी केली. मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सल्लागार नियुक्त करण्याच्या सूचना केल्याने या योजनेच्या कामांना लवकरच मुहूर्त लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...