आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरखधंदा:जिल्ह्यात आयपीएल क्रिकेटवर सट्टेबाजार जोमात, दिवसाला कोट्यवधींची उलाढाल; देवाण-घेवाणीसाठी पंटर कालू, आशू, बाबा, चेत्या अॅक्टिव्ह

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल क्रिकेटच्या सामन्यावर कोट्यवधींचा सट्टा लागत असून, या दीड महिन्यात कुठल्याच प्रकारची रिस्क नको म्हणून जिल्ह्यातील नामांकीत बुकी सध्या भूमिगत झाल्याची माहिती आहे. तर देवाण-घेवाणचा संपूर्ण खेळ हा पंटरवर सोडला आहे. यात प्रामुख्याने कालू, आशू, बाबा, चेत्या आदी पंटर सध्या अॅक्टिव्ह असून, ही चेन तोडण्याची मोठी कसरत पोलिसांना कारवाई लागणार आहे.

अवैध व्यवसायातील सर्वाधिक आर्थिक उलाढाल करणारा क्रिकेट बेटिंगचा जुगार राजरोसपणे शहरासह जिल्ह्यात सुरू आहे. आयपीएल सामने सुरू असल्याने प्रत्येक तासाला कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्यांमध्ये नामांकीत व्यावसायिकांसह तरुण मंडळी गुंतली आहे. संपूर्ण जिल्ह्यात बुकींनी बेटिंगची पाळेमुळे रोवली आहे. यात व्हाइट कॉलर गुन्हेगारांचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षांत काही नामांकीत बुकींसह त्यांचे पंटर पकडून पोलिसांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु ही दहशत केवळ नावापुरतीच राहिली आहे.

आयपीएलसारख्या मोठ्या टुर्नामेंटमधून कोट्यवधींची कमाई करण्याचा डाव बुकींकडून आखण्यात आला आहे. कुठल्याही क्षणी पोलिसांकडून आपल्यावर कारवाईचा बडगा उगारल्या जाईल आणि पूर्णत: नुकसान नको म्हणून बुकी भूमिगत झाले आहे. मात्र, जिल्ह्यात सर्वत्र पंटर सोडून सट्टेबाजीचा खेळ पूर्णपणे चालू ठेवला आहे. यात प्रामुख्याने कालू, आशू, बाबा, चेत्या आदी पंटर सध्या अॅक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहे. दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल पोलिसांच्या डोळ्यादेखत होत आहे. तरीसुद्धा पोलिसांना कुठल्याही प्रकारची कल्पना नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. गतवर्षी सट्टेबाजांवर पोलिसांनी कारवाई करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. यंदा आयपीएल सुरू होऊन दहा दिवस लोटले तरी पोलिसांनी दाखवण्यापुरती आर्णी शहरात एकमेव आयपीएल सट्टेबाजीवर कारवाई केली. त्या व्यतिरिक्त दुसरी कारवाई करण्यात पोलिसांना यश आले नाही.

अशा पद्धतीने लागते सामन्यांवर बोली
बेटिंग खेळणारा व्यक्ती बुकीच्या नंबरवर फोन करून पैसे लावतो. याच्या नोंदी बुकीच्या वहीत होतात. खेळणारा जिंकला तर त्याला लावलेल्या रकमेच्या तुलनेत ५ ते १०० पट अधिक पैसे दुसऱ्या दिवशी पोहोचवले जातात. कोणत्या संघाला किती भाव आहे हे देखील बुकींमार्फत खेळणाऱ्यांना कळते. पैसे जमा करणे आणि पोहोचवण्यासाठी हवाला यंत्रणेचा वापर होतो. लाखो रुपयांच्या रकमा केवळ फोनवरील बोलीवरच फिरवल्या जातात, हे विशेष.

बेटिंगसाठी बोगस सिमकार्डचा वापर
क्रिकेट बेटिंगसाठी मोबाइल कंपन्यांचे सिमकार्ड घेताना बोगस नावांची कागदपत्रे वापरली जात आहेत. सिमकार्ड वितरक आणि बुकी काही लोकांच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून सिमकार्ड खरेदी केल्याचे दाखवतात. काही सामन्यांसाठी याचा वापर करून पुन्हा त्याच कागदपत्रांच्या आधारे दुसरे सिमकार्ड खरेदी केले जाते, अशी माहिती बऱ्याचदा पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

बेटिंगसाठी होतोय तीन साधनांचा वापर
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेटिंगचे जाळे वाढले आहे. मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही आणि नोंदी करण्यासाठी वही एवढ्याच साधनांवर बेटिंग घेणे सुरू होते. एखाद्या अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये किंवा घरात बसूनही बेटिंग घेतले जाते. पैशांची देवाण-घेवाण करण्याची ठिकाणे मात्र नेहमी बदलतात. पोलिसांशी संगनमत करून यातून कोट्यवधी रुपयांची कमाई केली जाते. अनेकदा कारवाई करूनही क्रिकेट बेटिंगचे समूळ उच्चाटन झाले नाही.

पथके अॅक्टिव्ह, माहिती मिळाल्यास कारवाई करू
इंडियन प्रीमिअर लीग सुरू आहे. या दरम्यान सट्टेबाजांवर कारवाई करण्यासाठी वेगवेगळे पथके कार्यरत केली आहेत. विशेष म्हणजे या पथकातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून माहिती घेऊन कारवाई केली जात आहे. आर्णी येथील कारवाईत आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर मिळालेल्या माहितीवरून यवतमाळात सुद्धा सोमवारी कारवाई केली होती. तत्पूर्वी सट्टेबाजांनी घटनास्थळावरून पळ काढला.
डॉ. दिलीप भुजबळ, जिल्हा पोलिस अधीक्षक, यवतमाळ.

बातम्या आणखी आहेत...