आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोळी जेरबंद:खंडणीसाठी अपहरण करून दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडणीसाठी एका तरूणाचे अपहरण करीत दरोडा टाकणाऱ्या टोळीतील चौघांना पांढरकवडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई पांढरकवडा तालुक्यातील पिंपळखुटी परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. शेहबाज खान उर्फ लाला युनूस खान, शरीक खान शब्बीर खान, साहील मिर्झा फारूक मिर्झा आणि साहील खान सलीम खान सर्व रा. गडी वार्ड पांढरकवडा अशी ताब्यात घेण्यात आलेल्या त्या चौघांची नावे आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, पांढरकवडा शहरातील आखाड वार्ड परिसरातून जात असलेल्या संजय चमेडीया यांना दि. २२ ऑगस्टला रात्री १२.१५ वाजताच्या सुमारास एका स्विफ्ट डिझायर गाडीतील व्यक्तींनी अडवले होते. यावेळी कार चालक लाला खान व त्याच्या तीन साथीदारांनी संजय चमेडीया यांच्यासोबत असलेल्या यश चमेडीया याला मारहाण करीत अॅक्टीव्हा गाडीतील एक लाखाची रोख, त्यांच्या खिश्यातील ८ हजार ५०० रूपयाची रोख आणि महागडा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर यश चमेडीया याला जबरदस्तीने वाहनात बसवून घेवून गेले. तसेच संजय याचा गळा आवळून जिवे मारण्याची धमकी देत १५ लाखाची खंडणी मागण्यात आली.

यावेळी भितीपोटी त्याने दोन टप्प्यात १५ लाख देण्याचे कबूल केले. दरम्यान खंडणी मागणारे गवराई शिवारात यश चमेडीया याला स्विफ्ट गाडीने घेवून येत असतांना रस्त्यावरील नागरिकांना दिसून आले. त्यामूळे लाला खान व त्याच्या साथीदार गाडी पलटविण्याचा प्रयत्न करीत असतांना यश याने गाडीचे लॉक उघडले. यावेळी दरोडेखोरांनी त्याला गाडीतून बाहेर ढकलून देत गवराई जंगलाच्या दिशेने पळ काढला. या प्रकरणी पांढरकवडा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पांढरकवडा पोलिसांनी या टोळीची शोधमोहीम सुरू केली. अश्यातच पांढरकवडा शहरातील नदीम गोरी याला अटक करीत त्याची चौकशी सुरू केली. त्यावरून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले.

दरम्यान टोळीतील फरार असलेले चौघे पिंपळखुटी शिवारात येणार असल्याची गोपनीय माहिती पांढरकवडा पोलिसांना मिळाली. त्यावरून शुक्रवारी रात्री सापळा रचून त्या चौघांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्या चौघांनी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबूली दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरकवडा ठाणेदार जगदिश मंडलवार, पथकातील वसंत चव्हाण, किशोर आडे, मारोती पाटील, शशिकांत चांदेकर यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...