आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफ्लोराईड, क्षारयुक्त, अशुद्ध पेय जलामुळे सर्वत्र किडनी ग्रस्त गाव म्हणून महागाव तालुक्यातील वडद गावाची ओळख आहे. मध्यंतरी माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या निधीतून वडद (ब्रह्मी), सेवादासनगर ह्या दोन गावात जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली होती, परंतू गेल्या दीड वर्षांपासून जलशुद्धीकरण यंत्र बंद आहे. परिणामी, गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने त्यांना किडनी आजाराच्या मरण यातना सहन करत जीवन जगावे लावत आहे. आतापर्यंत जवळपास ४० जण किडनीच्या आजाराने दगावल्याची नोंद आहे. महागाव तालुक्यातील वडद हे घनदाट जंगलाला लागून असलेले आदिवासी बहुल गाव आहे. या गट ग्रामपंचायतीत सेवा नगर बंजारा तांडा समाविष्ट आहे. या गावची लोकसंख्या जवळपास सात हजार एव्हढी आहे. गावात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही फ्लोराईड, क्षारयुक्त पाण्यामुळे शापीत ठरले. सरकारी नोंदीनुसार या गावातील जवळपास ४० किडनी ग्रस्त रुग्ण दगावले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी हा लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न तत्कालीन मंत्री लोकनेते मनोहर नाईक यांच्यासमोर मांडला होता. त्यांनी तत्परतेने लक्षावधी रुपयांचा निधी आरओ यंत्रणा उभारण्यासाठी उपलब्ध करून दिला. यातून आरओ यंत्रणेतील सुविधा असलेले पहिले गाव वडद ठरले. ही आरओ यंत्रणा दुरुस्तीअभावी ठप्प पडली आहे. त्यामुळे पुन्हा फ्लोराइडयुक्त दूषित पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. सद्य:स्थितीत नागरिक दहा लिटरच्या कॅनला २० रुपये मोजून ब्रह्मी गावातून पिण्याचे पाणी आणत आहेत. स्वाती पडघने यांनी सरपंच पदाचा प्रभार नव्याने हाती घेतल्यानंतर बंद पडलेली आरओ यंत्रणा सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. ही यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी ग्रामसेवकांनी परस्पर एजन्सीला काम दिलेले होते. प्रत्येकी तीन लाखांचे दोन धनादेश या एजन्सीला देण्यात आले. प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम अर्धवटच आहे. नागरिकांना शुद्ध पेयजल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना सरपंच स्वाती पडघने यांनी केली आहे.
उपचारासाठी पैसे आणावे कुठून ^शुद्ध पाणी मिळत नाही. पतीचाही मृत्यू झाला आहे. मला किडनीचा आजार आहे. उपचारासाठी पैसे कुठून आणावे हा प्रश्न आहे. शेती नाही, मजुरी करून उदरनिर्वाह करावा लागतो. नांदेड जिल्ह्यात जाऊन उपचार करावा लागतो. अनिता चव्हाण, रुग्ण.
उपचारासाठी खूप खर्च ^गावातील जलशुद्धीकरण यंत्र अनेक महिन्यापासून बंद आहे. मला किडनी आजाराचा त्रास आणखी वाढला आहे. गोळ्या सुरू असून उपचारासाठी खूप खर्च होत आहे. शेतातील काम होत नसल्याने घरीच रहावे लागते. विकतचे पाणी आणून प्यावे लागत आहे. रवींद्र चव्हाण, रुग्ण
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.