आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशत:मोठ्या घरफोड्यांचा तपास वरिष्ठांकडे तरी, डिटेक्शन शून्य

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक, दोन नव्हे तर अनेक घरफोड्या, चोरीच्या घटनांमुळे शहरासह जिल्ह्यातील उच्चभ्रू वसाहतीतील नागरिक भयभीत झाले आहे. मागील काही महिन्यापासून या घटनांचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकारी करीत आहेत. मात्र, अद्याप यात कुठलाही सुगावा लागलेला नाही. डिटेक्शन करण्यास वरिष्ठ पोलिस अधिकारीसुद्धा निष्प्रभ ठरल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

शहरातील रंगोली मैदान जवळील सेवानिवृत्त अधिकारी लखानी कुटुंबीय धार्मीक कार्यक्रमासाठी बैंगलोर येथील मुलीकडे गेले होते. घरातील बेडरूमच्या लॉकर मधून सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्या, पाटल्या, अंगठी, कानातले रिंग, ब्रेसलेट, हातातील कडे, आदी तीस तोळे सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपयांची रोख चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले. त्यानंतर अरुणोदय सोसायटी येथील पन्ना उर्फ हिरालाल जयस्वाल त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील २० लाखांचे सोने आणि ७ लाखाची रोख असा एकूण २७ लाखाचा मुद्देमाल लंपास केला. यातील चोरटे सिसिटिव्ही कॅमेऱ्यात सुध्दा कैद झाले. मात्र, अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही.

जवळपास ७० तोळे सोने, १५ लाख राेख लंपास
शहरातील बालाजी सोसायटी आणि अरुणोदय सोसायटीतील घरफोडीत तब्बल ७० तोळे सोने आणि १५ लाखांची रोख चोरट्यांनी लंपास केली. या मोठ्या घटना शहरात गेल्या तीन महिन्यात घडल्या आहेत. अरुणोदय सोसायटीतील घरफोडी प्रकरणात पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे आढळून आले. मात्र, बालाजी सोसायटीतील घरफोडी प्रकरण अद्याप कुठलाच क्ल्यु पोलिसांच्या हाती लागला नाही.

एलसीबी, डीबी पथकाच्या डिटेक्शनला ब्रेक
जिल्हा पोलिस दलातील एलसीबी पथकाने आतापर्यंत एक ना अनेक मोठ-मोठ्या कारवाई करीत गुन्हे उघडकीस आणले. यामुळे जिल्ह्यात एलसीबी पथकाचा दबदबा निर्माण झाला होता. मध्यंतरी एलसीबी आणि स्थानिक पोलिस ठाण्यातील डीबी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फेरबदल झाले. त्यांच्या जागी नविन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाला. तेव्हापासून डिटेक्शन थंडावल्याच्या दिसून येत आहे.

खबऱ्यांचे नेटवर्क कोसळले
गेल्या काही वर्षात जिल्ह्यात घरफोड्या, दरोड्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या घटना घडत असताना त्यापैकी काही घटनांचा तपास कित्येक महिने लोटूनही थंड बस्त्यात पडला आहे. जिल्हा पोलिस दलात पूर्वी असलेले खबऱ्यांचे नेटवर्क कोसळल्याने या अनडिटेक्ट गुन्ह्याचा आकडा वाढत चालल्याचे बोलल्या जात आहे. गेल्या अडीच वर्षात चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

घाटंजी शहरात भरदिवसा घरफोडी, २ लाखांचा मुद्देमाल लंपास
शहरातील गायत्री मंदिराजवळ राहणारे रितेश नलगे यांच्या घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून जवळपास २ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना सोमवार, दि. १२ डिसेंबरला उघडकीस आली. अज्ञात चोर‌ट्याविरोधात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. गेल्या महिन्याभरात चोरीच्या अश्या ६ घटना घडल्या असून, या घटना वारंवार घडत आहेत. त्यात भरदिवसा ४ घटना घडल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...