आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह अधूनमधून अवकाळी पावसाने हजेरी लावली. मंगरूळपीर तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वारा, विजांच्या कडकडाटात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. गारपिटीने आंबा, पपई, टरबूज, उन्हाळी तिळ, मूग, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले . रविवारी सायंकाळी मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी, येडशी, कंझारा, बोरव्हा, चांधई, चेहल, धानोरा, कवठळ, मोहगाव्हण परिसरात जोरदार गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे गोगरीत पपई, आंबा, बिजवाई कांदा, भाजीपालासह इतर पिकांना मोठा फटाका बसल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. मंगरूळपीर शहरालगतच्या बालदेव येथील राजू चक्के यांच्या पपई फळबागेचे वादळीवारा व गारपिटीने माेठे नुकसान झाले.
वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या शेतातील काही झाडे तुटून शेतातील टरबूज पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील गोगरी हे गाव गावरान आंब्यांसाठी प्रसिद्ध आहे. रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या झाडाखाली आंब्याचा अक्षरश: सडा पडला. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसानीचा माेठा फटका बसला आहे. तसेच तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी काढणी करुन सुकवण्यासाठी ठेवलेली हळदही खराब झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे हळदीवर टाकलेल्या ताडपत्री उडून गेल्याने अनेक शेतकऱ्यांची हळद पावसाने भिजली आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे मंगरूळपीर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाची ही पडझड झाली आहे. तर तालुक्यातील कंझरा येथील मदन किसनराव मुखमाले यांच्या घरावर वीज कोसळल्याने नुकसान झाले. तालुक्यातील अनेक गावांतील वीजपुरवठा खंडीत झाला. सेलू बाजार परिसरातील सुमारे ३० गावांचा खंडीत झालेला वीज पुरवठा २४ तासानंतर सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.