आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील एक हजार दोनशे पेक्षा अधिक एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची ९५ लाखांपेक्षा ही अधिक रुपयांची वैद्यकीय देयके गेल्या चार वर्षांपासून देण्यात आली नाहीत. यामुळे त्यांना आजारांवरील खर्चासाठी कर्ज फेडताना नाकीनऊ येत आहेत. दुसरीकडे कोरोना व संप काळात उत्पन्न मिळाले नसल्यामुळे देयके देण्यासाठी अडचणी आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. आता मात्र, एसटी प्रशासनाकडून तीन महिन्यात सर्व देयके देण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या यवतमाळ विभागात सध्या चालक, वाहक आणि यांत्रिक असे जवळपास दोन हजार नऊशे कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांचा पगार आणि भत्ते कमी असल्याने आधीच त्यांना आर्थिक चिंतेचा सामना करावा लागतो. अशातच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातील चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची यांची वैद्यकीय देयके गेल्या ४ वर्षापासून प्रलंबित आहेत. यवतमाळ विभागासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे देयके अडकली असल्याचे सांगण्यात येत आहे.
अनेक कर्मचारी आजारपणात स्वतः रोखीने खर्च करतो व त्या खर्चाची परिपूर्ती एसटी कडून केली जाते. मात्र, ४ वर्षे झाले तरी देयके मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. अनेकांना कर्ज काढून आपल्या आजारावर उपचार करण्यासाठी खर्च करावा लागला. ते कर्ज अद्यापही अनेकांना फेडता आलेले नाही. अगोदरच एसटी कर्मचाऱ्यांना तुटपुंजे वेतन मिळते. त्यात कर्जाचे हप्ते व उदरनिर्वाहाची ताळमेळ घालणे अशक्य होत आहे. सध्या एक हजार दोनशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी तब्बल ९५ लाख रुपयांपेक्षा अधिक देयके थकली आहेत. सातत्याने वरिष्ठांकडे पाठपुरावा करूनही काहीच हाती लागलेले नाही.
कर्मचाऱ्यांची संख्या अधिक
देयके मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. अगदी कमी रकमेपासूनची देयके आहेत. कोरोना काळातही देयके आली आहेत. कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन तातडीने बिले देण्याची प्रक्रिया अधिक करण्यात येत आहे. अमोल गोंजारी, विभागीय नियंत्रक
महामंडळाकडून तयारी, एप्रिलपर्यंत मिळतील
विभागीय नियंत्रक म्हणून अमोल गोंजारी यांनी जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी वैद्यकीय बिले देण्यासाठी नियोजन केले आहे. प्रत्येक वर्षांतील महिनानिहाय देयकांचे वर्गीकरण सुरू केले आहे. त्यानुसार कमी व अधिक रकमेची देयकाचे नियोजन करून अधिक तातडीची तसेच दुर्धर रोगाची देयके अगोदर देण्याचेही नियोजन करण्यात येत आहे. तसेच एप्रिलपर्यंत सर्व देयके मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांचे वेतनही वेळेवर नाही,सावकारी चक्रव्यूहात
परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन दिलेल्या वेळेवर होत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना घर चालवणे अवघड होवून बसले आहे. एखादा दुर्धर आजार बळावल्यास कर्ज काढून बिल चुकते करावे लागते. यामुळे गाव खेड्यातील सावकारी चक्रव्यूहात एसटी कर्मचारी अक्षरक्ष: पिळून निघतो आणि कर्जबाजारी होत आहे.
विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता
एका वाहकाची अँजिओग्राफी व बायपास सर्जरी झाली. २०१९ लगा ७० हजार रुपये रकमेची वैद्यकीय बिले दिली होती. अजूनही खात्याकडून पैसे मिळत नाहीत. २०१७ च्या अगोदर वैद्यकीय देयके वेळेवर मिळायची. वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे ही प्रक्रियेवर विश्वास राहिला नाही, अशी भावना कर्मचारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे वैद्यकीय खर्च झाला तरी काही जण वैद्यकीय बिल सादर करत नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.