आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशैक्षणिक गुणवत्तेत कमी असल्याने जिल्ह्यात मंगळवार, दि. २२ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी तपासण्यासाठी मध्यावधी उपलब्धी सर्वेक्षण (मीड टर्म अचिव्हमेंट सर्वे) घेण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा सराव करून घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत.
केंद्रसरकारने सन २०१७ मध्ये देशातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण (नॅशनल अचिव्हमेंट सर्वे) घेतला होता. यामध्ये देशात १० जिल्हे कमी शैक्षणिक गुणवत्ता आणि तीनशे गुणांपेक्षा कमी गुण असलेले आढळुन आले. यात यवतमाळ जिल्ह्याला २९९ गुण मिळाले होते. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान समितीने सन २०२० मध्ये कमी गुणवत्ता आढळून आलेल्या जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक उपक्रम राबवण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानुसार सरकारने मार्च २०२२ मध्ये जिल्ह्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर राज्य शासनाने सुद्धा २७ ऑक्टोबर २०२१ ला ‘निपुण भारत’ हा कार्यक्रम शालेय शिक्षण विभागांतर्गत राबवण्यास सुरुवात केली. मार्च २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे.
दरम्यान, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे (एनसीआरटी) मार्फत मध्यावधी उपलब्धी सर्वेक्षण अंतर्गत मंगळवार, दि. २२ नोव्हेंबरला परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता तिसरी आणि पाचवी या इयत्तांची राष्ट्रीय संपादणूक पातळी तपासण्याकरिता ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ९४ शाळांची निवड केली.
जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
या परीक्षेच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, डायटचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, नगर पालिका प्रशासन अधिकारी, प्रकल्प अधिकारी, समाजकल्याण अधिकारी उपस्थित होते.
सव्वाशे नियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक
जिल्ह्यातून निवड केलेल्या ९४ शाळांमध्ये परीक्षा घेण्यासाठी मुख्य नियंत्रक अधिकारी म्हणून महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांची नियुक्ती केली आहे. प्रश्नपत्रिका शाळेत पोहोचवण्यासाठी १२३ नियंत्रण अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्याचबरोबर क्षेत्र अन्वेषक म्हणून ११२ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.